पुणे/तळेगाव दाभाडे : मोटारीत अमली पदार्थ असल्याची भीती दाखवून पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन पोलिस अंमलदार आणि तीन वॉर्डन अशा पाच जणांना अटक केली आहे, तर एक पोलिस नाईक चालक फरार आहे. या प्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
पोलिस अंमलदार अमोल ननावरे, तुषार ढावरे, वॉर्डन किसन बोंबले, नीतेश चव्हाण आणि तुषार घाडगे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खंडाळा महामार्ग पोलिस मदत केंद्रातील फरार पोलिस नाईक (चालक) अमोल वायकर याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भूषित शर्मा हे पाच जुलै रोजी दुपारी मित्रांसह मोटारीने पुण्याहून लोणावळ्याला चालले होते. ताजे गावाच्या हद्दीत आल्यानंतर अंबर दिवा लावलेल्या शासकीय वाहनाने त्यांची मोटार अडवली. महामार्ग पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या सहा जणांनी 'तुमच्या गाडीत अमली पदार्थ आहेत, ' असे सांगत कारवाईची भीती दाखवली. हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
पैसे घेण्यासाठी आरोपींनी शर्मा आणि त्यांच्या मित्रांना तळेगाव दाभाडे परिसरात नेले. त्याठिकाणी एटीएममधून पैसे काढण्यास त्यांना भाग पाडण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. मात्र, संशय आल्याने फिर्यादींनी पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर शर्मा यांनी तातडीने तक्रार नोंदवली.याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने पाच जणांना अटक केली. दोषी पोलिस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठविण्यात आला आहे.
फिर्यादीच्या गाडीत कोणतेही अमली पदार्थ आढळले नव्हते. एटीएममधून पैसे काढताना फिर्यादींनी प्रसंगावधान दाखवत पिंपरी चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. आरोपींमधील तिघे जण महामार्ग सुरक्षा पथकाच्या खंडाळा केंद्रात कार्यरत पोलिस आहेत, तर तिघे जण वाहतूक वॉर्डन आहेत. या सर्वांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. - संदीपसिंग गिल, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.