पुणे: श्रद्धा, समता, सेवा आणि भक्तीचा अलोट सागर असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आज पुण्यनगरीत मोठ्या उत्साहात आगमन झाले. दोन्ही पालख्या आज पुणे शहरात मुक्कामी आहेत. मात्र, याच सोहळ्यादरम्यान एका वारकऱ्याचा जीव धोक्यात आला होता, ज्याला पुणे पोलीस दलातील एका संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष आयपीएस (IPS) अधिकाऱ्याने आपल्या समयसुचकतेने आणि डॉक्टरी कसबाने जीवदान दिले. या 'खाकीतल्या विठ्ठला'ची म्हणजेच डीसीपी डॉ. संदीप भाजीभाकरे यांची ही कामगिरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पालखी आगमनावेळी वारकरी कोसळला
पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी संपूर्ण पुणे शहर सज्ज झाले असून बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा तैनात आहे. पालख्यांचे शहरात आगमन होत असतानाच, गर्दीत एका वारकऱ्याला अचानक फीट आली. फीट आल्यामुळे तो वारकरी थेट रस्त्यावर कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आजूबाजूला काही काळ गोंधळ उडाला आणि त्या वारकऱ्याला नेमके काय झाले, हे कोणालाच समजले नाही. मात्र, काही वेळातच त्याच्या तोंडातून फेस येऊ लागल्याने त्याला फीट आल्याचे आसपासच्या नागरिकांच्या लक्षात आले.
क्षणाचाही विलंब न लावता डीसीपी भाजीभाकरे मदतीला धावले
वारी काळात वाहतूक शाखेची चोख जबाबदारी सांभाळणारे पोलीस उपायुक्त (DCP) डॉ. संदीप भाजीभाकरे हे स्वतः बंदोबस्तावर जातीने हजर होते. त्यांनी गर्दीत वारकऱ्याला खाली पडलेले आणि तोंडातून फेस येत असल्याचे पाहिले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता गर्दी बाजूला केली आणि थेट वारकऱ्यापाशी पोहोचले.पोलीस अधिकारी असण्यासोबतच डॉ. भाजीभाकरे हे मूळचे डॉक्टर (MBBS) असल्याने त्यांनी त्वरित आपले डॉक्टरी कसब दाखवले. त्यांनी त्या वारकऱ्याला प्रथमोपचार देत अत्यंत योग्य पद्धतीने हाताळले. त्यांच्या या तातडीच्या वैद्यकीय उपचारांमुळे काही वेळातच त्या वारकऱ्याची प्रकृती स्थिर झाली आणि त्याचे प्राण वाचले.
सोशल मीडियावर , 'खाकीतला विठ्ठल' म्हणून कौतुक
डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी आपल्या कृतीतून 'सेवा आणि भक्ती'चा खरा अर्थ दाखवून दिला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. खाकी वर्दीतील विठ्ठलाने वारकऱ्याचे प्राण वाचवले, अशा आशयाच्या पोस्ट नेटीझन्सकडून शेअर केल्या जात असून, भाजीभाकरे यांच्या संवेदनशीलतेचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोण आहेत डॉ. संदीप भाजीभाकरे?
डॉ. संदीप भाजीभाकरे हे महाराष्ट्र पोलीस दलातील अत्यंत लोकप्रिय, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष आयपीएस (IPS) अधिकारी म्हणून ओळखले जातात. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील असून, त्यांनी आयपीएस होण्यापूर्वी वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस (MBBS) चे शिक्षण पूर्ण करून डॉक्टरीची पदवी मिळवली आहे. कर्तव्य बजावताना सामाजिक जाणिवा जपणारे अधिकारी म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक आहे. यापूर्वी त्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्याआधी त्यांनी औरंगाबाद येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणूनही सेवा बजावली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.