सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल: जत तालुक्यातील डफळापूर काळेशिवार येथील सागर डांगे खून प्रकरणी दोन भावांना जन्मठेपेची शिक्षा!
सांगली :-जत तालुक्यातील डफळापूर येथील काळेशिवार परिसरात शेतजमिनीच्या वादातून सागर बाळासो डांगे या तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन सख्ख्या भावांना सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच प्रत्येकी ५,००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. ३) एस. आर. पडवळ यांच्या न्यायालयात सत्र केस नं. ४६४/२०१९ चा हा खटला चालला. ज्ञानेश्वर पंडीत डांगे (वय २१) आणि संतोष पंडीत डांगे (वय २३, दोघे रा. कोळेशिवार, डफळापूर, ता. जत, जि. सांगली) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना भारतीय दंड विधान (IPC) कलम ३०२ व ३४ अन्वये दोषी ठरवले.
नेमकी घटना काय घडली होती?
ही घटना २६ जुलै २०१९ रोजी घडली होती. मयत सागर डांगे आणि आरोपी यांच्यात शेतजमिनीवरून जुना वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी सकाळी १० वाजता आरोपींनी मयताच्या हिश्याच्या रानात ट्रॅक्टरने फणकुळव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मयत आणि आरोपींमध्ये बाचाबाची झाली होती.
त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास आरोपी ट्रॅक्टर घेऊन उभ्या बाजरीच्या पिकात नांगरणी करण्यासाठी पुन्हा आले. मयत सागर आणि त्याच्या कुटुंबाने त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी क्र. १ ज्ञानेश्वर डांगे याने सागरच्या डोक्यात कुऱ्हाडीने प्राणघातक वार केला. तर आरोपी क्र. २ संतोष डांगे याने लोखंडी पाईपने त्याला बेदम मारहाण केली. या गंभीर हल्ल्यात सागर डांगे याचा जागीच मृत्यू झाला होता.
१२ साक्षीदार अन् प्रत्यक्षदर्शींची साक्ष ठरली महत्त्वाची
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मयताचा भाऊ (फिर्यादी), मयताची आई आणि पत्नी यांची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून दिलेली साक्ष आरोपींना दोषी ठरवण्यात अत्यंत महत्त्वाची ठरली.
जत पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गुंडरे यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात सबळ दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद
सरकार पक्ष व फिर्यादीतर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील शैलेंद्र राजाराम हिंगमिरे यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयात सादर केलेले भक्कम पुरावे आणि केलेला प्रभावी युक्तिवाद यामुळे आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यात यश आले.
या कामात जत पोलीस ठाण्याचे पैरवी अंमलदार तुकाराम बंडगर (ब. नं. ६२१), कोर्ट पैरवी वंदना मिसाळ (मपोह नं. १२४९), कोर्ट ऑर्डरली पोह सतीश माळी (ब. नं. २६६) व पैरवी कक्षाचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक एस. डी. कापूरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.