गेल्या काही वर्षांत फसवणुकीच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. चुकून एखाद्या गोष्टीवर क्लिक झालं आणि नंतर फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. आता अशाच प्रकारच्या फसवणुकीची पण वेगळी घटना उघडकीस आली आहे. एका बँकेतील अधिकाऱ्याने बँकेतच ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या व्यक्तीने ‘गोल्ड लोन’ मध्ये संबंधित बँकेची तब्बल ३ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. मात्र, या व्यक्तीने हे पाऊल का उचललं? याचं कारण ऐकून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.
नेमकं घटना काय?
दिल्लीतील एका बिगर-बँकिंग वित्तीय कंपनीत काम करणाऱ्या पंकज यांना २०१५ मध्ये अनोळखी नंबरवरून एका महिलेचा फोन आला. त्यानंतर दोघांचा संपर्क सुरू झाला आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र, पंकज आधीच विवाहित होता, त्याला दोन मुले होती. यातच त्याला फोन आलेल्या त्या महिलेवर प्रेम झालं. पण त्याच्या पगाराममधून कुटुंब आणि त्या महिलेचा खर्च भागवणं कठीण झालं. त्यामुळे पंकजने कंपनीतून पैसे हडपण्यास सुरुवात केली. ६ वर्षात ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ‘गोल्ड लोन’मध्ये ही फसवणूक केली. या काळात त्याने वेगवेगळ्या व्यवहारांच्या माध्यमातून ९० लाख रुपये त्या महिलेशी संबंधित बँक खात्यांवर वळवले. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, २०१९ ते २०२५ या दरम्यान पंकज आणि त्याच्या एका सहकाऱ्याने बनावट केवायसी कागदपत्रे आणि खोट्या दागिन्यांचा वापर करून ६८३ बनावट गोल्ड लोन खाती उघडली होती. यामध्ये २८ लोकांच्या नावांवर ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतल्याचा आरोप आहे. यामध्ये यातील अनेकजण संबंधित कंपनीचे माजी ग्राहक होते अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पंकजला ७ जुलै रोजी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
ही घटना उघडकीस कशी आली?
संबंधित कंपनित ऑगस्ट २०२५ मध्ये झालेल्या अंतर्गत लेखापरीक्षणादरम्यान हा कथित फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. पंकज हा या कंपनीत एका दशकाहून जास्त काळ ‘गोल्ड ॲप्रायझर’ म्हणून काम करत होता. म्हणजे कर्ज मंजूर करण्याआधी तारण म्हणून ठेवल्या जाणाऱ्या दागिन्यांचे हॉलमार्क आणि वजन तपासण्याचं आणि दागिने कंपनीच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवणं, ही त्याची जबाबदारी होती.या प्रकरणाबाबत कंपनीच्या संचालकांनी सांगितलं की, पंकज सांभाळत असलेल्या खात्यांमध्ये काही विसंगती आढळून आली होती. त्यानंतर त्याची दुसऱ्या शाखेत बदली करण्यात आली. मात्र, त्याने तिकडे रुजू होण्यास नकार दिला. त्यामुळे कंपनीला संशय आला आणि कंपनीने लेखापरीक्षणाचे आदेश दिले. तेव्हा लेखापरीक्षणादरम्यान कंपनीच्या अधिकृत नोंदींमध्ये उल्लेख असूनही लॉकरमधून गायब असलेल्या सुमारे १४ लाख रुपये किमतीच्या सोन्याबाबत पंकजला विचारणा करण्यात आली, तेव्हा तो संतापला. त्यानंतर तो कंपनीवरच आरोप करत रागाच्या भरात कार्यालयातून निघून गेला आणि पुन्हा कार्यालयात परतलाच नाही, असं कंपनीच्या संचालकांनी सांगितलं.
पोलिसांनी काय माहिती दिली?
पोलिसांच्या माहितीनुसार, पंकजने बनावट आणि खोट्या सोन्याच्या दागिन्यांचं मूल्यमापन खरं सोनं असं केलं होतं आणि त्याची बनावट केवायसी, कागदपत्रे व ग्राहकांची खोटी ओळख वापरून सोन्यावरील कर्जाची बनावट खाती तयार केली होती. या प्रकरणात कंपनीत्या तक्रारीनुसार एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान अशी माहिती समोर आली की, २०१५ मध्ये एका चुकीच्या क्रमांकावरून आलेल्या फोन कॉलनंतर या फसवणुकीला सुरूवात झाली होती. ती महिला दिल्लीतील होती. या दोघांमध्ये संभाषण सुरू झाल्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. तसेच पंकजने बँकेतून अपहार केलेल्या पैशांबाबत चौकशी केली असता यातील १६ लाख रुपयांचा एक व्यवहार महिलेच्या खात्यात जमा करण्यात आला होती अशी माहिती तपासात समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २०१९ ते २०२५ या काळात पंकजने त्या महिलेशी संबंधित असलेल्या विविध खात्यांवर ९० लाख रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली. तिची आणि आपल्या कुटुंबाची एकाच वेळी काळजी घेण्याचा दुसरा कोणताही मार्ग आपल्याकडे नव्हता त्यामुळे त्याने हे पाऊल उचललं असं त्याने चौकशीत सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.