🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! महाराष्ट्रातील ३८ रक्तपेढ्यांवर एफडीएची कारवाई, ३४ परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! महाराष्ट्रातील ३८ रक्तपेढ्यांवर एफडीएची कारवाई, ३४ परवाने निलंबित


मुंबई : राज्यभरात एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नभेसळ आणि अमली पदार्थांविरोधात कारवाईचा धडाका सुरु केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात सुरक्षित, दर्जेदार आणि प्रमाणित रक्ताची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, एफडीएने रक्त साठवणूक केंद्रांविरुद्ध एक व्यापक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ३८ संस्थांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३४ परवाने निलंबित करण्यात आले असून चार कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रक्त केंद्रे आणि रक्त साठवणूक केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या ४१३ परवानाधारक रक्त केंद्रे आणि ४६८ परवानाधारक रक्त साठवणूक केंद्रे आहेत. या सर्व केंद्रावर एफडीएने कडक नजर ठेवली आहे. एप्रिल ते जून दरम्यान केलेल्या तपासणीत अनियमितता उघड झाल्यामुळे २१ रक्त केंद्रे आणि १३ रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले.
त्याचबरोबर, दोन रक्त केंद्रे आणि दोन रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. या तपासणीदरम्यान, परवान्याच्या अटींचे उल्लंघन, गुणवत्ता व्यवस्थापनातील त्रुटी, नोंदींमधील विसंगती आणि तापमान नियंत्रण, रक्त तपासणी, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन व इतर वैधानिक मानकांचे पालन न करणे यासह गंभीर त्रुटी आढळून आल्या.

येथे केलेली कारवाई

एफडीएने पुणे, सांगली, सातारा, अमरावती, ठाणे, मुंबई, कल्याण, वाशिम आणि इतर जिल्ह्यांमधील अनेक रक्त केंद्रे आणि रक्त साठवण केंद्रांवर कारवाई केली.

पुण्यातील बोरी परढी येथील पाटील हॉस्पिटल रक्त साठवण केंद्र आणि भिवंडी येथील आधार रक्त साठवण केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले.

जूनमध्ये एका तक्रारीच्या आधारे झालेल्या तपासानंतर माया ब्लड सेंटर आणि सर जे. जे. महानगर ब्लड सेंटरचे परवानेही रद्द करण्यात आले.

तपासणी सुरूच राहणार
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, रक्त हे केवळ औषध नसून जीवन वाचवणारे साधन आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रक्त पुरवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही रक्त केंद्राला किंवा रक्त साठवणूक केंद्राला सोडले जाणार नाही. भविष्यातही नियमित आणि अचानक तपासण्या सुरू ठेवून सार्वजनिक आरोग्य सुनिश्चित केले जाईल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.