"आमीर खानला संपवा आणि ५ कोटी मिळवा!" परमहंस आचार्यांचे वादग्रस्त विधान; नितेश राणेंच्या 'त्या' भूमिकेचे केले जोरदार समर्थन
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमीर खान याच्या वैयक्तिक आयुष्यावरून आणि तिसऱ्या लग्नावरून सुरू झालेला वाद आता वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी आमीर खानवर टीका केल्यानंतर, आता अयोध्येतील तपस्वी छावणीचे पीठाधीश्वर जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी एक अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
"जो कोणी आमीर खानला संपवेल, त्याच्या कुटुंबाला मी 5 कोटी रुपयांचे बक्षीस देईन," अशी जाहीर घोषणा आचार्यांनी केली आहे.
"नितेश राणेंचे वक्तव्य हा आरोप नसून वास्तव"
काही दिवसांपूर्वी मंत्री नितेश राणे यांनी आमीर खानच्या विवाहांचा संदर्भ देत त्याला 'लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर' म्हटले होते. या विधानाचे पूर्ण समर्थन करत परमहंस आचार्य म्हणाले, "नितेश राणे यांनी जे म्हटले आहे तो कोणताही आरोप नसून ते पूर्णपणे वास्तव आहे. आमीर खानने आतापर्यंत तीन लग्ने केली असून ती तिन्ही लग्ने हिंदू महिलांसोबत केली आहेत. या वयात केवळ 'लव्ह जिहाद'चा संदेश देण्यासाठी आणि षड्यंत्र रचण्यासाठी हे सर्व केले जात आहे. अशा लोकांना समाजात उघडे पाडले पाहिजे."
"कायदेशीर मदतही देणार"
आपल्या वादग्रस्त वक्तव्याचा पुनरुच्चार करताना परमहंस आचार्य यांनी थेट इनामाची रक्कम जाहीर केली. ते म्हणाले, "हे लोक समाजातील मोठे गुन्हेगार असून, सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे कट रचत आहेत. मी जाहीर करतो की, जो कोणी आमीर खानला कोणत्याही प्रकारे संपवेल, त्याच्यावर होणारा सर्व कायदेशीर खर्च आम्ही उचलणार आणि त्याच्या कुटुंबाला 5 कोटी रुपयांची रोख रक्कम घरपोच दिली जाईल. हिंदू सून-लेकींना जाळ्यात ओढणाऱ्या अशा 100-200 लोकांना जर संपवले, तर देशातील लव्ह जिहाद पूर्णपणे बंद होईल."
राम मंदिर ट्रस्ट चोरीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया
या मुलाखतीदरम्यान जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीच्या प्रकरणावर आणि ट्रस्टच्या वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, "श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने केली आहे. हा निर्णय पूर्णपणे योग्य आहे. या प्रकरणाची एसआयटी चौकशी पूर्ण प्रामाणिकपणे सुरू आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.