Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिंदे गटात अस्वस्थता! अहिरांच्या उमेदवारीमुळे अंतर्गत बंडाळी उफाळणार?

शिंदे गटात अस्वस्थता! अहिरांच्या उमेदवारीमुळे अंतर्गत बंडाळी उफाळणार?


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर "ऑपरेशन टायगर"ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे माजी नेते सचिन अहिर यांनीही शिंदेसेनेची वाट धरत विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या निर्णयामुळे शिंदेसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे. 

सचिन अहिरांच्या उमेदवारीने अंतर्गत नाराजी?
विधान परिषद उपसभापतीपदासाठी शिंदेसेनेकडून सचिन अहिर यांना उमेदवारी दिल्यानंतर निलम गोऱ्हे आणि कृपाल तुमाने हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या दोन्ही नेत्यांची नावे या पदासाठी संभाव्य दावेदार म्हणून चर्चेत होती. त्यामुळे अचानक सचिन अहिर यांना संधी मिळाल्याने पक्षात अंतर्गत खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे.
निलम गोऱ्हेंना पक्षाकडून नवी जबाबदारी?

उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास होत असलेल्या विलंबावरून बाहेरून आलेल्या नेत्याला संधी मिळू शकते, याची निलम गोऱ्हे यांना कल्पना होती, अशी चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपसभापतीपदाऐवजी त्यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, "पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारून पार पाडेन," अशी प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिली आहे. विधान परिषद उपसभापती म्हणून त्यांचा पाच वर्षांचा अनुभव असल्याने त्यांना कोणती नवी जबाबदारी दिली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

कृपाल तुमाने यांनीही पक्षासमोर मांडली भूमिका
विधान परिषद उपसभापतीपदासाठी कृपाल तुमाने यांचेही नाव चर्चेत होते. मात्र, त्यांनी पक्षाकडे आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांना भविष्यात मंत्रीपद देण्याचे आश्वासन देण्यात आले असून, त्यामुळे उपसभापतीपदाच्या शर्यतीत आपले नाव ठेवू नये, असा संदेश त्यांनी पक्ष नेतृत्वाला दिल्याचे सांगितले जात आहे. 

तसेच मंत्रीपदाची संधी मिळाल्यास जिल्ह्यात दहा आमदार निवडून आणण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. भविष्यात पुन्हा राष्ट्रीय राजकारणात, विशेषतः दिल्लीत काम करण्याची इच्छाही त्यांनी पक्षाकडे व्यक्त केल्याचे समजते. 

दरम्यान, सचिन अहिर यांच्या उमेदवारीनंतर शिंदेसेनेत सुरू झालेल्या या चर्चांकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्ष नेतृत्व या नाराजीवर कशाप्रकारे तोडगा काढते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.