सांगली महापालिकेत काँग्रेसची वज्रमुठ, मनमानी घरपट्टी वाढीविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा
सांगली: "राज्य सरकारने राजकीय हट्टापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक लांबवल्या आहेत. लोकप्रतिनिधी नसलेल्या या ४ वर्षांच्या प्रशासक काळात महाराष्ट्रात सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांना १० वर्षे मागे नेण्याचे पाप या सरकारने केले असून, जनतेचा आवाज दाबणाऱ्या या हुकूमशाहीचा जाब विचारण्याची वेळ आली आहे," असा थेट आणि घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते, आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी केला आहे.
आमदार कदम यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत भेट देऊन माजी महापौर, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात काँग्रेस नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते अत्यंत आक्रमक भूमिकेत बोलत होते.
जनतेचा आवाज दाबला; चौकशी करा!
पत्रकारांशी बोलताना आमदार कदम म्हणाले, "गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांवर अधिकारीच प्रशासक म्हणून ठाण मांडून बसले आहेत. 'आम्हाला जाब विचारणारे कोणीच नाही' अशा अविर्भावात अधिकाऱ्यांचा कारभार सुरू आहे. या काळात नागरी हिताची काय कामे झाली? आणि किती भ्रष्टाचार झाला? याचा लेखाजोखा शासनाने जाहीर करावा. राजकीय स्वार्थासाठी निवडणुका टाळून लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे."
नागरिकांवर अवास्तव घरपट्टी लादू नका; काँग्रेसचा कडाडून विरोध
भांडवली मूल्यावर आधारित अन्यायकारक घरपट्टी वाढीवरून आमदार विश्वजित कदम यांनी प्रशासनाला धारेवर धरले. "महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याला आमचा विरोध नाही, मात्र नागरिकांना विश्वासात न घेता एकतर्फी आणि अवास्तव करवाढ लादली जात असेल, तर काँग्रेस शांत बसणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.
त्यांनी आयुक्तांशी चर्चा करून खालील मागण्या मांडल्या:
टप्प्याटप्प्याने करवाढ करा: एकदम अवाजवी बोजा नागरिकांवर टाकू नका.
समन्वय साधा: नागरी सुविधा आणि करवाढ यांचा योग्य ताळमेळ घाला.
पक्षपातीपणा थांबवा: विकास निधी देताना सत्ताधारी-विरोधक असा दुजाभाव न करता समान निधी वाटप करा.
आयुक्तांची माघार: आमदार कदम यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आयुक्तांनी या करवाढीतील त्रुटींबाबत चर्चा करून फेरविचार करण्याची ग्वाही दिली आहे.
'लढवय्या' नगरसेवकांचे कौतुक; भविष्यात तीव्र आंदोलनाचे संकेत
महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करताना आमदार कदम म्हणाले, "विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि सर्वच नगरसेवक सभागृहात व रस्त्यावर नागरिकांची भूमिका हिरीरीने मांडत आहेत. नागरिकांच्या हक्कासाठी भविष्यात याहूनही तीव्र आंदोलन उभे करावे लागले, तर काँग्रेस मागे हटणार नाही."
केंद्राच्या धोरणांवर प्रहार
नीट (NEET) परीक्षा आणि सोनम वांगचुक: "देशातील विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या 'नीट' परीक्षेतील घोटाळ्याविरोधात जेष्ठ शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्यासारखा माणूस दिल्लीत उपोषणाला बसतो, पण केंद्र सरकारला त्याची पर्वा नाही. जे सरकार शास्त्रज्ञांचे ऐकत नाही, ते
सर्वसामान्यांचे प्रश्न काय सोडवणार?"
शेतकऱ्यांना विरोध, 'शक्तीपीठ'ला ७० हजार कोटी: "सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवायला आणि महापालिकांना द्यायला सरकारकडे निधी नाही. मात्र, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असतानाही 'शक्तीपीठ' महामार्गासाठी ७० हजार कोटी रुपये एका रात्रीत उपलब्ध होतात. हा कुठला न्याय?" असा सवाल करत आमदार कदम यांनी केंद्र व राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमावर सडकून टीका केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.