बापरे! नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये निघाल्या जिवंत अळ्या; व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल, 'एफडीए'कडे तक्रार दाखल!
अकोल्यात नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्याचा दावा; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
संबंधित पालकांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि ऑनलाइन ग्राहक मंचाकडे अधिकृत तक्रार दाखल केली.
उत्पादनाची गुणवत्ता, पॅकेजिंग आणि साठवणुकीची चौकशी करून योग्य कारवाईची मागणी.
अकोला: लहान मुलांच्या आवडीच्या चॉकलेटबाबत अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका नामांकित कंपनीच्या चॉकलेटमध्ये वळवळणाऱ्या अळ्या आढळल्याचा दावा करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुलासाठी खरेदी केलेले चॉकलेट उघडल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्याचा दावा संबंधित पालकांनी केला असून, त्यांनी अन्न व औषध प्रशासन (FDA) तसेच ऑनलाइन ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
चॉकलेट उघडताच धक्का
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील संतोष शिंदूरसे यांनी आपल्या मुलासाठी एका नामांकित कंपनीचे चॉकलेट खरेदी केले होते. चॉकलेटचे पॅकेट उघडल्यानंतर त्यामध्ये वळवळणाऱ्या अळ्या दिसल्याचा त्यांचा दावा आहे. त्यानंतर त्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संतोष शिंदूरसे यांनी संबंधित उत्पादनाची गुणवत्ता, उत्पादनाची मुदत, साठवणूक आणि पॅकेजिंग यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने संभाव्य आरोग्याचा धोका टळल्याचेही त्यांनी सांगितले.
FDAकडे तक्रार
या घटनेनंतर संबंधित पालकांनी अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. चॉकलेटमध्ये अळ्या कशा आल्या, उत्पादन किंवा साठवणुकीत काही त्रुटी होती का, याची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता या तक्रारीवर अन्न व औषध प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऑनलाइन ग्राहक मंचाकडेही धाव
याशिवाय संतोष शिंदूरसे यांनी ऑनलाइन ग्राहक तक्रार निवारण पोर्टलवरही तक्रार नोंदवली आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रकार असल्याने संबंधित कंपनीने याबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित कंपनीची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. तक्रारीची चौकशी आणि संबंधित यंत्रणांच्या अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.