सांगली :- शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवस-रात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचा अत्यंत असंवेदनशील आणि बेजबाबदार कारभार समोर आला आहे. शहरातील प्रसिद्ध खाऊ गल्ली परिसरातील कचरा उठवण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि कष्टाचे काम करणाऱ्या महिला बचत गटाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून वेळेवर पगारच मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सकाळी-संध्याकाळ राबूनही हातात शून्य!
खाऊ गल्ली परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरू नये यासाठी या महिला कर्मचारी सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या दोन सत्रांत (शिफ्ट) प्रामाणिकपणे सेवा बजावत असतात. खाऊ गल्लीत गर्दीच्या वेळी जमा होणारा कचरा वेळेवर उचलणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि वाहनांची ने-आण करणे अशी कष्टाची कामे या महिला करतात. मात्र, एवढे कष्ट करूनही महापालिकेकडून अथवा संबंधित ठेकेदाराकडून वेळेवर पगार मिळत नसल्याने या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सावकारी कर्ज अन् उसनवारीचा बोजा!
वेळेवर पगार न मिळाल्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांना कौटुंबिक गरजा, मुलांचे शिक्षण आणि औषधोपचारासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. घरखर्च चालवण्यासाठी नाईलाजाने दुसऱ्यांकडून उसनवारी करणे किंवा सावकारांचे उंबरे झिजवणे या महिलांना भाग पडत आहे. महापालिकेच्या या दिरंगाईमुळे या गरीब महिलांवर कर्जाचा डोंगर साचत चालला असून, त्या मानसिक तणावाखाली वावरत आहेत.
"आम्ही रोज प्रामाणिकपणे काम करतो. पण पगार वेळेवर न मिळाल्याने घर कसे चालवायचे, असा प्रश्न आहे. थकलेले पगार भागवण्यासाठी लोकांकडून उसने पैसे घ्यावे लागत आहेत. आता तर सावकारांचे कर्ज डोक्यावर झाले आहे," अशी व्यथा एका महिला कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर मांडली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.