अंबरनाथः लोकप्रतिनिधींनी जनतेच्या कररूपी पैशांची राखण करायची असते, पण जर तेच ”चोरी आणि भ्रष्टाचार थोडाफार चालेल” असे उघडपणे म्हणू लागले तर राजकारणाचा स्तर कुठपर्यंत घसरला आहे, याचा अंदाज येतो. असाच एक अत्यंत संतापजनक आणि तितकाच धक्कादायक प्रकार अंबरनाथ नगरपरिषदेत उघडकीस आला आहे. ”भ्रष्टाचार आणि चोरी झाली पाहिजे, फक्त टक्केवारी कमी हवी” असा अजब आणि निलाजरा युक्तिवाद अंबनाथ नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी शुक्रवारी केला. एका जबाबदार पदावर बसलेल्या लोकप्रतिनिधीने भर सभागृहात केलेल्या या वक्तव्यावर शहरात संतप्त पडसाद उमटले.
शुक्रवारी अंबरनाथ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू होती. या सभेमध्ये कामकाज सुरू असताना एका सदस्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अंबरनाथ नगर परिषदेचे महायुतीचे उपनगराध्यक्ष आणि मूळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदाशिव पाटील यांनी ही मुक्ताफळे उधळली. प्रश्नाचे उत्तर देताना त्यांचा तोल इतका सुटला की त्यांनी थेट भ्रष्टाचाराचे आणि चोरीचे समर्थन करण्यास सुरुवात केली. 'भ्रष्टाचार आणि चोरी व्हायलाच पाहिजे पण अति व्हायला नको ती, भ्रष्टाचार हा असलाच पाहिजे पण त्याचा पर्सेंटेज एकदम कमी असला पाहिजे. मी बोललेल्या मताशी तुम्ही सहमत नाहीत का, असाही प्रतिप्रश्न त्यांनी यावेळी उपस्थितांना केला. तुम्हालाही बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, असेही पाटील बिनदिक्तपणे म्हणाले.
नगराध्यक्षांनी मारला डोक्याला हात
सदाशिव पाटील हे बेताल वक्तव्य करत असताना त्यांच्या शेजारीच नगराध्यक्षा तेजश्री करंजुले बसल्या होत्या. उपनगराध्यक्षांची ही घसरलेली जीभ आणि विषय भरकटत असल्याचे पाहून त्यांनी पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
“शांत राहा, काय बोलताय, समोर पत्रकार आहेत, ” अशी समज नगराध्यक्षांनी त्यांना दिली. भ्रष्टाचाराचे उघड समर्थन करूनही चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नसलेला लोकप्रतिनिधीचा हा निर्ढावलेलापणा पाहून शेवटी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले हताश झाल्या आणि त्यांनी चक्क डोक्याला हात लावला. विशेष म्हणजे नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांनी शहरातील यापूर्वीच्या भ्रष्टाचाराला विरोध करत त्याविरूद्ध प्रचार करत, ना खाऊंगी, ना खाने दुंगी म्हणत निवडणूक लढली आणि जिंकली होती.
“मी काय चुकीचं बोलतोय का?
“नगराध्यक्षांनी वारंवार थांबवण्याचा प्रयत्न करूनही सदाशिव पाटील बोलतच राहिले. केवळ बोललेच नाहीत, तर आपल्या वक्तव्यावर ठाम राहत त्यांनी उलट तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनाच विचारणा केली की,”मी काही चुकीचं बोलतोय का? ” एका जबाबदार पदावरील व्यक्तीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून थांबणे अपेक्षित होते. मात्र, सदाशिव पाटील कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. समोर एक नगरसेवकही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पाटील बोलतच राहिले.हा सर्व संतापजनक प्रकार आणि सदाशिव पाटील यांनी उधळलेली ही ”मुक्ताफळे” कॅमेऱ्यात अगदी स्पष्टपणे कैद झाली आहेत. ”चोरी करा, पण थोडी करा” हा कोणता नवीन राजकीय धर्म महायुतीचे नेते पाळत आहेत, असा संतप्त सवाल आता अंबरनाथचे नागरिक विचारत आहेत. या खळबळजनक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्याचे समर्थन करणाऱ्या या उपनगराध्यक्षांवर कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.