वारणावती: चांदोली धरण परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांत ८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे सर्वाधिक १४४ मिलिमीटर पाऊस झाला असून, तेथे आजअखेर एकूण १, ०७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सततच्या पावसामुळे परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत असून त्यांचे पाणी वारणा नदीत मिसळत असल्याने नदीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील खुंदलापूर, मणदूर, सोनवडे, खोतवाडी, काळोखेवाडी, आरळा, करुंगली, मराठेवाडीसह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. डोंगराळ भागात दाट धुके, जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वातावरण ढगाळ बनले आहे. पावसाचा हा जोर कायम राहिल्यास डोंगरमाथ्यावरील धबधबेही प्रवाहित होण्याची शक्यता आहे.
या पावसामुळे भात पिकासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. काही दिवसांच्या पावसाच्या उघडिपीनंतर शेतकरी चिंतेत होते. मात्र, मोटारीच्या साहाय्याने तयार केलेल्या भाताच्या तरव्यांना वेळेवर आणि मुबलक पाऊस मिळाल्याने रोपे जोमात आली असून परिसरात सध्या भात रोपलावणीच्या कामांना वेग आला आहे.
दरम्यान, चांदोली धरणक्षेत्रात आजअखेर ३५० मिलिमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे गेल्या ४८ तासांत चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल १ टीएमसीची वाढ झाली आहे. सध्या धरणात ६, २१३ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून धरणाची पाणीपातळी ५९९.७२ मीटरपर्यंत पोहोचली आहे. धरणात सध्या १२.५० टीएमसी पाणीसाठा आहे.
कोयना पाणलोटात शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या २४ तासांत महाबळेश्वर येथे २३३ मिलिमीटर, नवजा येथे २१० मिलिमीटर, तर कोयना येथे १८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा २० टीएमसी, तर चांदोली धरणातील साठा १३ टीएमसीवर पोहोचला आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ होत असून, सकाळी आयर्विन पुलाजवळ पाणीपातळी सहा फूट होती. सायंकाळी त्यात अर्ध्या फुटाने वाढ झाली. जिल्ह्यातील पाऊस जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सरासरी २७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक नोंद झाली आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.