'सिंहगड'मध्ये कोट्यवधींचा वेतन घोटाळा


आंबेगाव येथील सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमधील ५.०६ कोटी रुपयांच्या वेतन गैरव्यवहाराचे प्रकरण अधिकच चिघळले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले यांच्यासह सहा जणांविरुद्ध २७ शिक्षकांचे सुमारे सहा वर्षांचे वेतन थकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शुक्रवार पेठेतील ४५ वर्षीय शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी (दि. २) हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सचिव सुनंदा मारुती नवले, उपाध्यक्ष रचना नवले (आष्टेकर), उपाध्यक्ष रोहित मारुती नवले, लेखा विभागातील संजय मोरे आणि शरद जराडे तसेच संस्थेचे अन्य विश्वस्त यांचा समावेश आहे. या प्रकरणात 'सीविक मिरर'ने मारुती नवले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाही.

'सीविक मिरर'ने या प्रकरणासंदर्भात शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला असता, या वेतन संकटाचा परिणाम केवळ एका शाळेपुरता मर्यादित नसून संस्थेच्या विविध शाळांतील अध्यापन व्यवस्थेवरही झाल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वेतन न मिळाल्याने अनेक अनुभवी शिक्षक संपावर गेले किंवा त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. परिणामी, व्यवस्थापनाने क्लॉक अवर बेसिस (सीएचबी) शिक्षक आणि नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वर्ग सुरू ठेवले आहेत. नियमित अध्यापन विस्कळीत झाल्याने वर्गाचे तास कमी होणे, अनुभवहीन शिक्षकांकडून शिकविले जाणे आणि शैक्षणिक अनिश्चितता यांचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. शिक्षक आणि पालकांच्या प्रतिनिधींनी राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. व्यवस्थापन आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर एफआयआर दाखल करण्याची वेळ आल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

गेली २४ वर्षे सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका अंशिनी जोशी 'सीविक मिरर'शी बोलताना म्हणाल्या, ''विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही अध्यापन सुरू ठेवले. मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही काहीच बदल झाला नाही. अखेर आमच्याकडे गुन्हा दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता."

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलमधील २७ शिक्षकांना गेल्या अनेक वर्षांत एकतर पगारच मिळाला नाही किंवा अत्यल्प रक्कम देण्यात आली. वारंवार मागणी करूनही ''लवकरच थकीत वेतन दिले जाईल,'' अशी आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कोणतीही रक्कम देण्यात आली नाही. तक्रारीनुसार, शिक्षकांनी सातत्याने वेतनाची मागणी केल्यानंतर त्यांना प्रश्न न विचारता काम सुरू ठेवण्यास सांगण्यात आले, अन्यथा नोकरीवरून काढून टाकण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तक्रारदाराचे एकट्याचे १९ लाख ३६ हजार २०७ रुपये वेतन थकीत असून उर्वरित २६ शिक्षकांचे मिळून ४ कोटी ८७ लाख ४७ हजार २११ रुपये थकीत आहेत. अशा प्रकारे एकूण थकीत रक्कम ५ कोटी ६ लाख ८३ हजार ४१८ रुपये इतकी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले, ''वेतन न मिळालेल्या सर्व शिक्षकांनी आमच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या २७ शिक्षकांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासाचा भाग म्हणून मारुती नवले आणि इतर आरोपींना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे."

वेतन मागणाऱ्यांना नोकरीवरून काढून
टाकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी?
भारती विद्यापीठ पोलिसांनी सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले आणि अन्य पाच जणांविरुद्ध २७ शिक्षकांची तब्बल ५.०६ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुमारे सहा वर्षे वेतन न देता शिक्षकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच थकीत वेतनाची मागणी करणाऱ्या शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

संस्थेच्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्येही थकवले वेतन
पोलिसांच्या माहितीनुसार, एप्रिल २०२० पासून आजपर्यंत आंबेगाव येथील सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलमध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुणे आणि महाराष्ट्रातील विविध भागांत अभियांत्रिकी, तांत्रिक महाविद्यालये, काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी, सिंहगड लॉ कॉलेज, सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स यांसह अनेक शैक्षणिक संस्था चालवते. या संस्थांमध्ये सुमारे सहा हजार शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचारी कार्यरत आहेत.

एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे की, सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीमध्ये अनेक वर्षांपासून पगार उशिरा किंवा अनियमितपणे देण्याची समस्या कायम आहे. विविध संस्थांतील शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून अंशतः किंवा अजिबात वेतन मिळत नसल्याचा आरोप आहे. याशिवाय, नवले रुग्णालयातील परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनाही अनेक महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थेच्या विविध शाखांतील कर्मचाऱ्यांनी वारंवार आंदोलने केली; मात्र व्यवस्थापनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

वेतन न मिळाल्याने सुरक्षारक्षकाची आत्महत्या
तक्रारीत यापूर्वीच्या एका घटनेचाही उल्लेख आहे. सिंहगड संस्थेतील एका सुरक्षारक्षकाला सुमारे दोन वर्षे वेतन न मिळाल्याने त्याने संस्थेच्या परिसरात आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला असून, त्या प्रकरणातही मारुती नवले आणि अन्य विश्वस्तांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वेतनाअभावी शिक्षक आर्थिक अडचणीत;
२०२५चा पगार नाही, टीडीएस मात्र कापला
शिक्षकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वरिष्ठ प्राध्यापकांच्या मते, अनेक वर्षांपासून पगार वेळेवर न मिळाल्याने शिक्षकांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. २४ वर्षांपासून सिंहगड स्प्रिंग डेल स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या अंशिनी जोशी म्हणाल्या, "गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांना नियमित किंवा वेळेवर वेतन मिळत नाही. कोविड काळापासून २०२६ पर्यंत सुमारे ४० ते ४१ महिन्यांचे वेतन थकीत किंवा अनियमित राहिले आहे. २०२५ मधील संपूर्ण पगारही मिळालेला नाही. त्यावर टीडीएस मात्र कापण्यात आला. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरच काही हप्ते मिळाले. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही पुन्हा वर्गात गेलो; मात्र सतत पाठपुरावा करूनही काहीच बदल झाला नाही. शिक्षकांना ईएमआय, वैद्यकीय खर्च आणि घरखर्च भागवणे कठीण झाले आहे. आम्ही मुख्यमंत्री आणि शिक्षण विभागाकडेही दाद मागितली; पण काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे अखेर एफआयआर दाखल करावा लागला."

पालकांची चिंता वाढली
यासंदर्भात 'सीविक मिरर'ने काही पालकांशीही संवाद साधला. ''पगाराचा प्रश्न गेल्या काही काळापासून शाळेला सतावत आहे. गेल्या वर्षी दिवाळीनंतर बसचालकांनीही वेतनासाठी १५ ते २० दिवस संप केला होता. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. यंदा शाळा सुरू झाल्यानंतर पुन्हा शिक्षकांना पगार मिळालेला नसल्याचे समजले. माझी मुलगी सातवीत आहे. तिला दररोज केवळ एक तास नियमित अध्यापन मिळते. उर्वरित वेळ शिक्षकांच्या कमतरतेमुळे वाया जातो. सध्या सीएचबी शिक्षकांकडून वर्ग घेतले जात आहेत. अनेक अनुभवी शिक्षकांनी नोकरी सोडली असून त्यांच्या जागी कमी वेतनावर नवीन शिक्षक नियुक्त केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत चिंता वाटते,'' असे एका पालकाने नमूद केले.

दुसऱ्या एका पालकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले, ''शिक्षकांना चार-पाच वर्षांपासून पगार मिळालेला नसल्याने वारंवार आंदोलने होत आहेत. अनेक शिक्षक संपावर आहेत किंवा त्यांनी नोकरी सोडली आहे. प्राथमिकचे शिक्षक माध्यमिक वर्ग शिकवत आहेत, तर नव्याने आलेले अनुभवहीन शिक्षक वर्ग घेत आहेत. चाचणी परीक्षा सुरू झाल्या आहेत; पण विद्यार्थ्यांची योग्य तयारी झालेली नाही. फी भरावी की मुलांना दुसऱ्या शाळेत घालावे, याबाबतही पालक संभ्रमात आहेत. शाळा बदलली तर पुस्तके, गणवेश आणि इतर खर्च पुन्हा करावा लागेल. शिवाय, भरलेली ठेव रक्कमही परत मिळालेली नाही.''

पालक संघटनेची भूमिका
पालक संघटनेच्या प्रतिनिधी जयश्री देशपांडे म्हणाल्या, ''२०१७-१८ पासून शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न कायम आहे. अनेकदा वर्षभरात फक्त एक-दोन महिन्यांचा पगार दिला जातो किंवा तोही मिळत नाही. सध्या सुमारे २४ महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे १५ जूनपासून शिक्षकांचा संप सुरू आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतरही प्रश्न सोडविण्याऐवजी व्यवस्थापनाने तासिका तत्त्वावरील शिक्षकांची नियुक्ती केली आहे. पालकांनी पूर्ण फी भरली आहे. मात्र सर्व सिंहगड शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागितली; मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.''

प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी?
यासंदर्भात 'सीविक मिरर'ने संपर्क साधला असता परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते म्हणाले, ''आतापर्यंत सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलमधील २७ शिक्षकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. प्रत्येक तक्रारदाराच्या थकीत वेतनाची रक्कम वेगवेगळी आहे. तक्रार दाखल करणाऱ्या ४५ वर्षीय शिक्षिकेच्या प्रकरणात सुमारे १९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. एकूण संशयित आर्थिक गैरव्यवहाराची रक्कम सुमारे ५ कोटी रुपये असून या रकमेतून टीडीएसही कपात करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित सर्व कागदपत्रांची सध्या पडताळणी सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास सुरू असून, सर्व पुराव्यांची सखोल छाननी केली जात आहे.''

शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी कठीण परिस्थिती
सिंहगड स्कूलच्या वडगाव शाखेतील एका शिक्षकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, वेतनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम असून व्यवस्थापनाने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात कधीच पूर्ण झाली नाहीत.

''२०१८ पासून आमच्या वेतनाचा प्रश्न कायम आहे. यंदा २६ जानेवारी रोजी मारुती नवले यांनी आमचे थकीत वेतन लवकरच देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आम्हाला आशा निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर कोणतीही प्रगती झाली नाही. त्या घटनेनंतर नवले यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही. थकीत वेतनाच्या मागणीसाठी आम्ही गेल्या १५ ते २० दिवसांपासून संपावर आहोत. मात्र, प्रश्न सोडविण्याऐवजी शाळेने पर्यायी शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव काय आहे, याची आम्हाला माहिती नाही. सध्याची परिस्थिती शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठीही अत्यंत कठीण बनली आहे,'' अशी व्यथा त्यांनी 'सीविक मिरर'कडे मांडली.

एकूण संशयित आर्थिक गैरव्यवहाराची रक्कम सुमारे पाच कोटी रुपये असून या रकमेतून टीडीएसही कपात करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित सर्व कागदपत्रांची सध्या पडताळणी सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास सुरू असून सर्व पुराव्यांची सखोल छाननी केली जात आहे.
- मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.