नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्बल २०० तोळे सोन्याची फसवणूक झाली आहे. घरातील जुने सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका सराफ व्यावसायिकाने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. या हायप्रोफाईल फसवणुकीप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण शहरात याची चर्चा रंगली आहे.
विश्वास संपादन करून केली फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सराफ व्यावसायिक योगेश बाळकृष्ण दाभाडे याने गेल्या दोन वर्षांपासून मुर्तडक कुटुंबाशी जवळीक साधली होती. कुटुंबाचा पूर्ण विश्वास संपादन केल्यानंतर त्याने घरातील महिलांना एक आकर्षक योजना सांगितली. जुने सोन्याचे दागिने दिल्यास ते दुप्पट करून परत देतो, असे आमिष दाखवले. या भूलथापेला बळी पडून मुर्तडक यांच्या कुटुंबातील महिलांनी घरातील दागिने त्याच्या स्वाधीन केले.
२०० तोळे सोन्यावर मारला डल्ला
संशयित योगेश दाभाडे याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कुटुंबातील महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. त्याने अशोक मुर्तडक यांच्या पत्नीकडील १०० तोळे, मुलीकडील ५० तोळे आणि सुनेकडील ५० तोळे असे एकूण २०० तोळे (सुमारे २ किलो) सोन्याचे दागिने दुप्पट करण्याच्या बहाण्याने ताब्यात घेतले. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. दागिने ताब्यात घेतल्यानंतर संशयित व्यक्तीने दीड वर्षांपासून केवळ वेळकाढूपणा केला. मूळ दागिने परत करण्याऐवजी विविध कारणे देऊन तो टाळाटाळ करत राहिला. त्यानंतर कुटुंबातील महिलांनी ही घटना अशोक मुर्तडक यांच्या कानावर घातली.अखेर कुटुंबाला फसवणूक झाल्याचे समजताच अशोक मुर्तडक यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मोठ्या आर्थिक फसवणुकीचा सखोल तपास सुरू केला आहे. मात्र, मुर्तडक कुटुंबियांची झालेली फसवणुक पाहून नाशिकमध्ये खळबळ माजली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.