🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वांगचुक कुटुंब आणि आंदोलनाचा जुना इतिहास! इंदिरा गांधींनी स्वतः लडाख गाठून सोडवले होते सोनम वांगचुक यांच्या वडिलांचे उपोषण!

वांगचुक कुटुंब आणि आंदोलनाचा जुना इतिहास! इंदिरा गांधींनी स्वतः लडाख गाठून सोडवले होते सोनम वांगचुक यांच्या वडिलांचे उपोषण!


यवतमाळ : लडाखचे प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक सध्या दिल्ली येथे उपोषणावर बसले आहेत. या पार्श्वभूमीवर, एका अत्यंत महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनेला माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत उजाळा दिला.

१९८४ मध्ये सोनम वांगचुक यांचे वडील उपोषणाला बसले असताना, देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतः उपोषणस्थळी जाऊन त्यांचे उपोषण सोडविले होते, अशी आठवण मोघे यांनी करून दिली. या ऐतिहासिक प्रसंगाचा समाज माध्यमात आलेला एक अत्यंत दुर्मीळ फोटोही त्यांनी पत्रकारांना दाखवला.

मंत्री राहिलेले सोनम वांग्याल आणि लडाखचे आंदोलन
सोनम वांगचुक यांचा जन्म लडाखच्या उलेयटोकपो गावात सोनम वांग्याल आणि तेजरिंग वांग्मो यांच्या घरी झाला होता. त्यांचे वडील सोनम वांग्याल हे लडाखमधील नेते होते आणि त्यांनी जम्मू-काश्मीर सरकारमध्ये मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. १९८४ मध्ये सोनम वांग्याल यांनी लेह लडाखच्या स्थानिक प्रश्नांवरून उपोषण सुरू केले होते. त्यावेळी केंद्र सरकारने अत्यंत संवेदनशीलता दाखवली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतः लडाख गाठून, उपोषणस्थळी जाऊन वांग्याल यांचे उपोषण सोडवले होते, अशी आठवण मोघे यांनी सांगितली. सध्या २०१८ मधील रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक हे देखील जनहितासाठी उपोषणाला बसले आहेत; मात्र सध्याचे मोदी सरकार अशी कोणतीही संवेदनशीलता दाखवताना दिसत नाही, असा खेद मोघे यांनी व्यक्त केला.
धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालू नका

याच पत्रकार परिषदेत माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि बिरसा क्रांती दलाचे अध्यक्ष दशरथ मडावी यांनी केंद्र सरकारच्या उदासीन धोरणावर तीव्र शब्दांत प्रहार केला. ते म्हणाले की, नीट पेपरफुटी प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने पूर्णतः केलेली नाही. या गंभीर प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालण्याचे काम भाजप सरकार करत आहे. शिक्षणमंत्र्यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा देणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

वांगचुक यांच्या जीवाला धोका
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताची बाजू घेऊन उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांच्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सरकारने तात्काळ त्यांचा जीव वाचवण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी मोघे यांनी केली. काँग्रेसच्या काळात संवेदनशीलता दाखवून अनेक मंत्र्यांनी छोट्या कारणांवरूनही राजीनामे दिले होते, तसेच अण्णा हजारे यांच्या उपोषणावेळी सरकारने शिष्टमंडळ पाठवून चर्चा केली होती; मात्र सध्याचे सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत मोघे यांनी केंद्र सरकारचा तीव्र निषेध नोंदवला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.