Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्याला यश; वसंतदादा रुग्णालय परिसरात साकारणार सुसज्ज कॉलेज व वसतिगृह

आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्याला यश; वसंतदादा रुग्णालय परिसरात साकारणार सुसज्ज कॉलेज व वसतिगृह

सांगलीत १०० जागांचे शासकीय 'बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज'; ३३.४८ कोटींचा निधी मंजूर!

​सांगली (दिनांक ०९ जुलै २०२६): सांगली जिल्हा आणि परिसरातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राज्य शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सांगली येथील शासकीय जी.एन.एम. (पदविका) नर्सिंग महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन (Upgradation) करून, आता तिथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन 'बी.एस्सी. नर्सिंग पदवी महाविद्यालय' व सुसज्ज वसतिगृह सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी पायाभूत सुविधा, यंत्रसामुग्री व वाहनांसह एकूण ३३.४८ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती सांगली मतदारसंघाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी दिली.

​महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने ८ जुलै २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. 'Upgradation of Schools of Nursing to College of Nursing' या केंद्रीय योजनेअंतर्गत या महाविद्यालयासाठी ७.०० कोटी रुपयांचा १००% केंद्र पुरस्कृत निधी मंजूर झाला आहे.

​असे असेल नियोजित महाविद्यालय आणि वसतिगृह:

​भव्य कॉलेज बिल्डिंग (१८.३२ कोटी रु.): पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आवारात ४,५०० चौ.मी. क्षेत्रफळाची इमारत उभारली जाईल. यात आधुनिक नर्सिंग फाऊंडेशन लॅब, कॉम्प्युटर लॅब, प्रिको क्लिनिकल सायन्स लॅब, लायब्ररी आणि मल्टिपर्पज हॉल असतील.

​सुसज्ज वसतिगृह (१४.२५ कोटी रु.): बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी ३,५०० चौ.मी. क्षेत्रफळाचे वसतिगृह बांधले जाईल. यात इंडियन नर्सिंग काउन्सिलच्या नियमांनुसार स्टडी रूम, रिक्रिएशन रूम आणि डायनिंग हॉलसह किचनची उत्तम सोय असेल.

​इतर सुविधा (९१ लाख रु.): लॅब व तांत्रिक सुविधांसाठी ११ लाख, शैक्षणिक कामकाजासाठी वाहन खरेदीकरिता ४० लाख आणि लायब्ररी व नवीन पुस्तकांसाठी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

​वैद्यकीय क्षेत्राला मिळणार बळकटी

​सांगलीत हक्काचे शासकीय परिचर्या पदवी महाविद्यालय सुरू व्हावे, यासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

​"सांगली हे दक्षिण महाराष्ट्राचे प्रमुख वैद्यकीय केंद्र (Medical Hub) आहे. या नवीन महाविद्यालयामुळे सांगलीतील शासकीय रुग्णालयाला अधिक सक्षम आणि प्रशिक्षित मनुष्यबळ मिळेल, ज्याचा थेट फायदा गरीब व गरजू रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्यात होईल. सांगलीच्या वैभवात यामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे."
— आमदार सुधीरदादा गाडगीळ

​या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार गाडगीळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे सांगलीकरांच्या वतीने आभार मानले आहेत. तसेच, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव आणि डॉ. रुपेश शिंदे यांनीही या भरीव निधीबद्दल आमदार गाडगीळ व मंत्र्यांचे विशेष आभार मानले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.