🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली महापालिकेत '६०० कोटींच्या टक्केवारीचा खेळ'; सत्ताधाऱ्यांच्या वादावरून विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा घणाघाती हल्लाबोल!

सांगली महापालिकेत '६०० कोटींच्या टक्केवारीचा खेळ'; सत्ताधाऱ्यांच्या वादावरून विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांचा घणाघाती हल्लाबोल!


​नागरिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवू देणार नाही; डीपीआरमध्ये सुधारणा न झाल्यास न्यायालयात जाण्याचा आणि रस्त्यावर उतरण्याचा इशारा

सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेत ६०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या डीपीआरवरून (DPR) दोन सत्ताधारी पदाधिकाऱ्यांमध्ये रंगलेला वाद हा अत्यंत दुर्दैवी आणि महापालिकेच्या कारभाराला काळिमा फासणारा आहे, असा तीव्र संताप विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर भ्रष्टाचाराचे आणि 'टक्केवारीच्या खेळाचे' गंभीर आरोप करत संपूर्ण प्रशासनालाच धारेवर धरले.

​भाजप नेत्यांचा ताबा सुटलाय की त्यांचाही सहभाग?
​"महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांवर त्यांच्याच भाजप नेत्यांचा कसलाही वचक अथवा कंट्रोल राहिला नसल्याचे चित्र आहे. ६०० कोटींच्या कामांवरून सुरु असलेला हा राडा पाहता यात भाजपचे वरिष्ठ नेतेही सामील आहेत का?" असा सवाल विचारत मंगेश चव्हाण यांनी या वादामागे मोठ्या प्रमाणावर टक्केवारीचे गणित दडल्याचा संशय व्यक्त केला.
​कार्यालयात बसून तयार केला डीपीआर; २०% नागरिकांच्या घरांवर संक्रांत!

​डीपीआरच्या तांत्रिक चुकांवर बोट ठेवताना मंगेश चव्हाण म्हणाले की, "६०० कोटींच्या या प्रकल्पातून ज्या भागात ड्रेनेज व गटारींची कामे होणार आहेत, त्यातील २० टक्के भाग हा थेट नागरी वस्तीतून जातो. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर न जाता बंद कार्यालयात बसून हा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे प्रकल्प राबवताना सर्वसामान्यांच्या घरांवर बुलडोझर चालवण्याची वेळ येणार आहे." नागरिकांच्या हक्कासाठी आक्रमक पवित्रा घेत त्यांनी इशारा दिला की, "प्रशासनाने तात्काळ या डीपीआरमध्ये सुधारणा करावी. अन्यथा आम्ही कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची घरे पाडू देणार नाही! यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू आणि गरज पडल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावू."

​नियम धाब्यावर बसवून मक्तेदाराची घाई कशासाठी?
या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून ३० टक्के निधी प्राप्त होणे बंधनकारक आहे. मात्र, शासनाचा हा निधी अजून आलाच नसताना मक्तेदाराने घाईघाईने काम का सुरू केले? असा सवाल उपस्थित करत हे काम पूर्णपणे बेकायदेशीर मार्गाने सुरू असल्याचा थेट आरोप चव्हाण यांनी केला.

​या पत्रकार परिषदेला नगरसेविका बिलकीस बुजरूक, नगरसेवक अमित शहा यांच्यासह पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत वाद आणि विरोधी पक्षाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे महापालिकेचे राजकारण भडकण्याची चिन्हे आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.