अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार हातात घेतल्यापासून अन्न पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात आणि भेसळीविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
मागील आठवड्यात मुंबई, पुणे यासारख्या शहरांत दूध भेसळ करणाऱ्यांवर छापे टाकल्यानंतर मुंबई पुण्यात जाणारे भेसळ दूध रोखले गेले. त्याचा फायदा आता कोल्हापुरातील गोकुळसह वारणा दूध संस्थेला झाल्याचे दिसून येत आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळ करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावल्याने दुधाची भेसळ करणाऱ्यांवर वचक बसला आहे. दुधातील भेसळीवर या विभागाची करडी नजर असल्याने राज्यासह कर्नाटकातून मुंबईत येणाऱ्या दुधाची आवक मंदावली आहे. त्यामुळे गोकुळच्या दूध विक्रीमध्ये गेल्या दहा दिवसात प्रतिदिनी तब्बल ७० हजार लिटर, तर 'वारणा'च्या दूध विक्रीत ३० हजार लिटरने वाढ झाली आहे.
सर्वाधिक मुंबई बाजारपेठेत विक्रीत वाढ दिसत आहे. गेल्या चार ते पाच दिवसापासून मुंबईत प्रतिदिन एक ते दीड लाख लिटर दुधाची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी आयुक्त मुंढे यांच्याकडे आल्या होत्या, राज्यभर कारवाई सुरू मुंबईत भेसळयुक्त येणारे दूध थांबले आहे. त्याचा परिणाम 'गोकुळ' व 'वारणा' दूध संघाच्या दूध विक्रीत झाला असून या दोन्ही संघाच्या दूध विक्रीत प्रतिदिनी १ लाख लिटरने वाढ झाली आहे.
भेसळ खोराविरोधात सुरु केलेल्या कारवाईबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी आयुक्त तुकाराम मुंडे यांचे आभार मानले आहेत. एकदा प्रामाणिक अधिकारी आला तर काय बदल होतात. हे लोकांनी पाहिले आहे. 25 टक्के दूध भेसळ येत होते हे सिद्ध झाले. याचा परिणाम गोकुळचे दूध विक्री वाढले आहे. राज्यभरात गोकुळ दूध मागणी आणखी वाढणार आहे, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.