केंद्र सरकारकडून विविध पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केवळ 5 टक्के वार्षिक सवलतीच्या व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. याशिवाय आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपयांपर्यंत टूलकिट प्रोत्साहनही दिले जाते.
या योजनेचा लाभ हात आणि पारंपरिक साधनांच्या मदतीने काम करणाऱ्या कारागिरांना मिळतो. योजनेत 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. लाभार्थी असंघटित क्षेत्रातील किंवा स्वयंरोजगार करणारा असणे आवश्यक आहे.अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे. तसेच मागील 5 वर्षांत स्वरोजगार किंवा व्यवसाय विस्तारासाठी केंद्र अथवा राज्य सरकारच्या अशाच कोणत्याही कर्जाधारित योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबातील केवळ एका सदस्याला या योजनेचा लाभ मिळतो. योजनेत कुटुंब म्हणजे पती आणि अविवाहित मुले असा अर्थ आहे. तसेच अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य सरकारी सेवेत कार्यरत नसावा.
कोणते 18 व्यवसाय योजनेत समाविष्ट?
योजनेत सुतार, नाव बनवणारे, शस्त्र बनवणारे, धातू कारागीर, टूल किट बनवणारे, कुलूपकार, सोनार, कुंभार, मूर्तिकार/दगड शिल्पकार, चर्मकार/बूट कारागीर, राजमिस्त्री, टोपली-चटई-झाडू बनवणारे, पारंपरिक खेळणी बनवणारे, न्हावी, हार बनवणारे, धोबी, शिंपी आणि मासेमारीचे जाळे बनवणारे यांचा समावेश आहे.
3 लाखांपर्यंत कर्ज कसे मिळते?
योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विनातारण एंटरप्राइज डेव्हलपमेंट लोन दिले जाते. पहिल्या टप्प्यात 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. त्याची परतफेड करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर पात्र लाभार्थ्याला दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त 2 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी 30 महिन्यांचा कालावधी आहे.या कर्जावर लाभार्थ्याला केवळ 5 टक्के वार्षिक सवलतीचा व्याजदर लागू होतो. उर्वरित व्याजाची भरपाई सरकारकडून बँकांना अनुदानाच्या स्वरूपात केली जाते. तसेच आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपयांपर्यंत टूलकिट प्रोत्साहन ई-व्हाउचरच्या माध्यमातून दिले जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.