कडेगाव / सांगली: जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई केली आहे. कडेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घर फोडून चोरी करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आंतरराज्यीय सराईत चोराला बेड्या ठोकण्यात एलसीबीच्या पथकाला यश आले असून, त्याच्याकडून १ लाख ३६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेल्या त्याच्या तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
राजवीर मंगल कार्यालयाजवळ लावला सापळा
जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व उप-निरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. १७ ऑगस्ट रोजी कडेगाव ते कडेपूर रोडवरील राजवीर मंगल कार्यालयाजवळ दोन दुचाकींवरून चार जण चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची पक्की बातमी अंमलदार प्रमोद साखरपे, हणमंत लोहार आणि अभिजीत ठाणेकर यांना मिळाली.मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलिसांनी मंगल कार्यालयाजवळ रात्रीच सापळा रचला. संशयित चार जण दोन दुचाकींवरून तेथे येऊन थांबले असता पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच तिघे जण अंधाराचा फायदा घेऊन दुचाकी तेथेच टाकून पसार झाले. पोलिसांनी पाठलाग करून एकाला ताब्यात घेतले.
मध्यप्रदेशातील आरोपी निष्पन्न
पकडण्यात आलेल्या आरोपीची चौकशी केली असता त्याने आपले नाव गवली छत्तेसिंग आदिवासी (वय २२, रा. चौपडा, ता. साईनगर, जि. पन्ना, राज्य- मध्य प्रदेश) असे सांगितले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात चांदीचे ब्रेसलेट आणि करदोडा आढळून आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या पळून गेलेल्या तीन साथीदारांसह (जबरास जगदीश पारधी, कुणाल कंजर, आणि महाराजा सुरभ लेले — सर्व रा. मध्य प्रदेश) ७ ते ८ दिवसांपूर्वी कडेगाव परिसरातील एक बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याची कबुली दिली. पळून गेलेल्या जबरास पारधी याच्याकडे सोन्याचे दागिने असल्याचे त्याने सांगितले.
१.३६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:चांदीचे दागिने: ७० ग्रॅम वजनाचे (अंदाजे किंमत रु. १६,१५०/-)वाहने: गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटार सायकली — ड्रीम युगा (MH-16-BK-4529) आणि एचएफ डिलक्स (MH-42-AC-1368) (अंदाजे किंमत रु. १,२०,०००/-)एकूण जप्त मुद्देमाल: रु. १,३६,१५०/-तपासाअंती हा गुन्हा कडेगाव पोलीस ठाण्यातील गु.र.नं. १६८/२०२५ (बी.एन.एस. कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४)) शी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कडेगाव पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, प्रशांत निशाणदार, कुमार पाटील, संजय पाटील, सुभाष सूर्यवंशी, अतुल माने, हणमंत लोहार, सुशिल मस्के, राजू मुळे, सुनिता शेजाळ, प्रमोद साखरपे, सुनिल जाधव, अभिजीत ठाणेकर, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार, रोहन घस्ते, गणेश शिंदे, सुशांत चिले तसेच सायबर पोलीस ठाण्याचे अजय पाटील, करण परदेशी, इम्रान महालकरी, कॅप्टन गुंडवाडे आणि विजय पाटणकर यांच्या पथकाने केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.