नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला! नाशिकची धुरा महाजनांकडे, तर गोगावलेंची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती
नाशिकच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाने याबाबत अधिकृत घोषणा करत गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, नाशिकसह रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रदीर्घ काळ सुरू असलेला तिढाही अखेर सुटला आहे. शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
राज्यातील फडणवीस सरकारला दीड वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी नाशिक आणि रायगड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे दोन्ही जिल्हे दीर्घकाळ पालकमंत्र्यांविना होते. मात्र, अखेर राज्य सरकारने या दोन्ही जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर करून रखडलेला तिढा सोडवला आहे.
नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे गिरीश महाजन यांच्याकडेच आता पालकमंत्रीपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तर, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा भरत गोगावले यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
महायुती सरकार स्थापन झाल्यापासून नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असल्याने या पदावर राष्ट्रवादीनेही दावा केला होता. शिवसेनेकडून दादा भुसे, तर राष्ट्रवादीकडून मंत्री छगन भुजबळ हे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक होते.
या पदावरून निर्माण झालेल्या वादामुळे सुरुवातीला जाहीर करण्यात आलेले मंत्री गिरीश महाजन यांचे पालकमंत्रीपद रद्द करण्याची वेळ सरकारवर आली होती. परिणामी, नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा तब्बल दीड वर्ष कायम राहिला आणि या पदाच्या नियुक्तीचा निर्णय रखडला होता. आता शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी तर, नाशिकच्या पालकमंत्रीपदी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.