भाजपा महापौरांच्या रक्षाबंधन कार्यक्रमात मोफत साड्या वाटपावेळी बरेलीत भीषण चेंगराचेंगरी! माजी सैनिकाच्या पत्नीचा मृत्यू
रक्षाबंधनाचे औचित्य साधून मोफत साड्या आणि भेटवस्तू वाटपाच्या कार्यक्रमात अचानक भीषण चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत ४५ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागला असून, इतर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील बरेली क्लबच्या मैदानावर गुरुवारी ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.
बरेलीचे महापौर उमेश गौतम आणि त्यांचे पुत्र पार्थ गौतम यांच्या संस्थेकडून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या कार्यक्रमात अचानक झालेल्या गर्दीच्या गोंधळामुळे आनंदाच्या वातावरणात शोककळा पसरली.
नेमकं काय घडलंय?
टाईम्स नाऊच्या बातमीनुसार, 'युवा सेवक संघ' आणि 'पार्थ गौतम फाउंडेशन'च्या माध्यमातून या भव्य रक्षाबंधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाच्या वर्षी जवळपास २०,००० महिलांना साड्या आणि इतर वस्तूंचे वाटप करण्याचे नियोजन होते. सकाळी १० वाजल्यापासूनच बरेली शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातून महिलांची तुफान गर्दी जमू लागली होती.
दुपारी ३ च्या सुमारास व्यासपीठाजवळ भेटवस्तू घेण्यासाठी महिलांची एकच घाई झाली. पाठीमागून आलेल्या गर्दीच्या लोटामुळे समोर असलेल्या महिलांवर प्रचंड दाब निर्माण झाला. बघता बघता मैदानावर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. अनेक महिलांना श्वास घेणे कठीण झाले, तर काही जणी जागीच भोवळ येऊन पडल्या. या धावपळीत अनेक लहान मुलांची आपल्या पालकांपासून ताटातूट झाल्याने ती रडू लागली.
उपचारापूर्वीच महिलेचा श्वास गुदमरला
या घटनेत चंद्रगुप्त पुरम भागातील रहिवासी असलेल्या मधू (वय ४५ वर्षे) या महिलेचा मृत्यू झाला. मधू या एका माजी सैनिकाच्या पत्नी होत्या. त्या आपल्या परिसरातील इतर महिलांसोबत कार्यक्रमाला गेल्या होत्या. गर्दीत अडकल्यामुळे त्यांचा श्वास गुदमरला. त्यांना तातडीने जवळच्या मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. इतर तीन जखमी महिलांवर जिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आयोजकांवर सुरक्षेच्या त्रुटींचा आरोप
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जमणार याची कल्पना असूनही प्रशासनाने आणि आयोजकांनी सुरक्षेची कोणतीही योग्य व्यवस्था केली नव्हती, असा गंभीर आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे.
दुसरीकडे, या दुर्घटनेवरून आता मतभेद पाहायला मिळत आहेत. महापौर उमेश गौतम यांनी कार्यक्रमात कोणतीही दुर्दैवी घटना घडल्याचा इन्कार केला आहे. 'कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडला. महिलेच्या मृत्यूची माहिती आम्हाला प्रसारमाध्यमांतून समजली,' असा दावा त्यांनी केला. पोलीस प्रशासनानेही अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.