अमली पदार्थांच्या विळख्यात सांगली जिल्हा : जनजागृती रॅलीच्याच ठिकाणी रात्री रंगते 'गांजा फुकऱ्यांची' बैठक; पोलिसांचा धाक संपल्याने सर्वसामान्यांत भीतीचे सावट
सांगली :- एका बाजूला वाढत्या नशेखोरीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे दावे केले जात आहेत, विशेष ‘टास्क फोर्स’च्या माध्यमातून मोहिमा आखल्या जात आहेत; तर दुसऱ्या बाजूला जनजागृतीसाठी इयत्ता ८ वी ते १० वीच्या हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने भव्य पोस्टर व चित्रकला स्पर्धा भरवल्या जात आहेत. परंतु, या तथाकथित उपक्रमांच्या आणि चमकोगिरीच्या पडद्यामागे सांगलीतील कायदा व सुव्यवस्थेचे पूर्णपणे ‘तीन-तेरा’ वाजल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. ज्या सांगलीत स्वतः पोलीसच सुरक्षित राहिले नाहीत, तिथे रक्षकच भक्षक बनलेल्या गुंडांपासून सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार? असा संतापजनक सवाल आता नागरिक विचारत आहेत.
ज्या मार्गावरून जनजागृती रॅली, तिथेच रात्री गांजा फुकऱ्यांची गँग!
पोलीस प्रशासनाच्या कारभारातील पांढरपेशा विरोधाभास उघड पडला आहे. अमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी ज्या ठिकाणाहून हजारो विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली, त्याच मुख्य ठिकाणी दररोज रात्री गांजा फुकणाऱ्यांची टोळकी उघडपणे बस्तान मांडून असतात. पोलिसांचे नाक असलेल्या ठिकाणीच अमली पदार्थांची विक्री आणि व्यसनाधिनतेचा हा नंगानाच सुरू असताना पोलीस प्रशासन मात्र डोळे मिटून बसले आहे. यावरून गुन्हेगारांना जिल्हा पोलिसांचा काडीचाही धाक उरलेला नाही, हेच स्पष्ट होते.
नागरिकांचा सवाल : पोलिसांवरील हल्ल्याला प्रशासनच जबाबदार!
जिल्ह्यात अवैध धंदे, गुंडगिरी आणि नशेखोरीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. त्यातच कायदा राबवणाऱ्या पोलिसांवरच थेट हल्ले होण्याचे प्रकार घडल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. "पोलीस जर स्वतःचे रक्षण करू शकत नसतील, तर सामान्यांनी कोणाकडे पाहायचे?" असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या संपूर्ण दुरवस्थेला पोलीस प्रशासनाचा ढिसाळपणा आणि नियोजनाचा अभावच जबाबदार असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
पोलीस अधीक्षकांनो, आता तरी आव्हान पेला आणि धाक दाखवा!
केवळ कागदी मोहिमा, पोस्टर स्पर्धा आणि रॅली काढून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन होणार नाही. गुन्हेगारांवर कायद्याचा बडगा उचलण्याची खरी गरज आहे. पोलीस अधीक्षक या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन शहरात उघड्यावर चालणाऱ्या नशेबाजांच्या टोळ्यांचा बंदोबस्त करणार का? खाकीचा हरवलेला धाक परत मिळवून देऊन गुन्हेगारांचे कंबरडे मोडणार का? याकडे आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.