🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खळबळजनक! 'राष्ट्रवादीमध्ये भाजपाचा स्लीपर सेल', बड्या नेत्याने व्यक्त केली शंका; 'सुनेत्रा पवारांना जी काही...'

खळबळजनक! 'राष्ट्रवादीमध्ये भाजपाचा स्लीपर सेल', बड्या नेत्याने व्यक्त केली शंका; 'सुनेत्रा पवारांना जी काही...'


राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून रिमाइंडर (आठवण) नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस 17 ऑगस्ट 2026 रोजी पाठवण्यात आली असून, ती 9 जुलै रोजी पाठवलेल्या पहिल्या कायदेशीर नोटीसीची आठवण करून देणारी आहे. पहिल्या नोटीसीला 15 दिवसांत उत्तर न दिल्याने ही रिमाइंडर नोटीस बजावली आहे. मात्र आता याच नोटीशीवरुन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भलतीच शंका उपस्थित केली आहे.

हे नोटीस प्रकरण काय?
26 फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह आव्हान दिले आहे. या पदावर सुनेत्रा पवारांची निवड झाली होती. ही निवड पक्षाच्या घटनेनुसार झाली नसल्याचा दावा सच्चिदानंद सिंह यांनी केला आहे. निवडणूक प्राधिकरण नेमले नव्हते, निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नव्हता आणि राष्ट्रीय प्रतिनिधींना नामांकन भरण्याची किंवा मतदान करण्याची संधी दिली नव्हती, असा आरोप करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रीय सरचिटणीस व निवडणूक आयोगाचे नोडल अधिकारी बृजमोहन श्रीवास्तव यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

26 फेब्रुवारीची निवड आणि त्याआधारे तयार केलेली पदाधिकाऱ्यांची यादी अवैध घोषित करावी, निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्रव्यवहार मागे घ्यावेत, अशी मागणी सिंह यांनी केली आहे. तसेच, पक्षाच्या घटनेनुसार योग्य निवडणूक प्राधिकरण नेमून नवीन संघटनात्मक निवडणुका घ्याव्यात असंही सिंह यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे. जर 15 दिवसांत उत्तर किंवा पालन झाले नाही, तर निवडणूक आयोग किंवा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे. सच्चिदानंद सिंह हे पक्षाचे झारखंड प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत आणि राष्ट्रवादीशी सुमारे 15 वर्षांपासून संबंधित आहेत.
नाना पटोले काय म्हणाले?

या नोटीस प्रकरणावरुन बोलताना नाना पटोलेंनी वेगळीच शंका उपस्थित करताना यामागे नेमकं कोण असू शकतं याबद्दलची शंका बोलून दाखवली आहे. "सुनेत्रा पवारांना जी काही नोटीस दिलेली आहे ती त्यांच्या पक्षांतर्गत आहे. यामागे सुनेत्रा पवारांच्या पक्षात असलेले भाजपाचे काही हस्तक आहेत. त्यांना स्लीपर सेल असे म्हणतात. त्यांच्या कोणाचा तरी यात हात असेल असं मला वाटत आहे," असं नाना पटोले म्हणालेत. आता नाना पटोलेंच्या या विधानावर भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.