छत्रपती संभाजीनगर: तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. तरुणाने आयफोनच्या कारणावरून टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात आयफोन हे आत्महत्येचे थेट कारण असल्याचे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू आहे.
घटनेनंतर समोर आलेल्या एका व्हिडीओमुळे आयफोनचा मुद्दा चर्चेत आला. या व्हिडीओमध्ये तरुणाला समजावून सांगताना एक व्यक्ती दिसत आहे. प्रत्यक्षदर्शीने तरुणाने नवीन आयफोन मागितल्याची चर्चा झाल्याचे नाकारले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, तरुणाकडे आधीपासूनच आयफोन होता. त्यामुळे केवळ मोबाईल आत्महत्येचे कारण नव्हते.दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासात तरुणाचा वडिलांसोबत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला, त्यावेळी काय बोलणे झाले आणि तरुणाच्या मनात नेमके काय सुरू होते, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.या घटनेत तरुणासह त्याच्या आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. घटनेनंतर सोशल मीडियावर एका कारणावर आधारित चर्चा सुरू झाली असली, तरी पोलिसांच्या तपासातून वेगळे चित्र समोर येत असल्याचे दिसत असून या प्रकरणातील नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.