🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'हे तुम्ही खा', महाराष्ट्रभर धाडी टाकणाऱ्या FDA च्या अधिकाऱ्याच्या तोंडात लोकांनी कोंबली एक्स्पायर्ड बिस्किटे; संभाजीनगरमधील घटना

'हे तुम्ही खा', महाराष्ट्रभर धाडी टाकणाऱ्या FDA च्या अधिकाऱ्याच्या तोंडात लोकांनी कोंबली एक्स्पायर्ड बिस्किटे; संभाजीनगरमधील घटना


तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात अन्न व औषध प्रशासन राज्यभरात धडक कारवाया करत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र एका अधिकाऱ्याच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. यावेळी संतप्त जमावाने चक्क एफडीए अधिकाऱ्याच्या तोंडात बिस्किटं कोंबण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये जमावाने अधिकाऱ्याला घेराव घालत जाब विचारला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जमाव संतप्त का झाला?
झालं असं की, एका पानटपरीवरून खरेदी केलेला खट्टा-मीठा चिवडा खाल्ल्याने दोन वर्षांच्या निष्पाप बालकाला चक्कर येऊन त्याची प्रकृती गंभीर झाली. चिमुकल्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या पालकांनी आणि नागरिकांनी थेट छत्रपती संभाजीनगरच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला फोन करून या घटनेची तक्रार नोंदवली.
तोंडात मुदतबाह्य बिस्किटं कोंबली

तक्रारीनंतर एफडीएचे अधिकारी तपासणीसाठी घटनास्थळी पोहोचले, पण तिथे खराब चिवडा गायब करण्यात आला असा आरोप आहे. मात्र, तपासात इतर अनेक मुदतबाह्य बिस्किटांचे पुडे आढळून आले. अधिकाऱ्यांनी हे बिस्किट जप्त तर केले, पण कोणताही कठोर कारवाईचा बडगा न उगारता पानटपरी चालकाकडून आर्थिक देवाणघेवाण करून प्रकरण दडपल्याचा खळबळजनक आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त अधिकाऱ्याला घेराव घालत, बिस्कीट स्वतः खाऊन बघा असे म्हणत बिस्कीट तोंडात घातले. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

"हे तुम्हीच खा..."
लोकांनी एफडीए  अधिकाऱ्याला घेराव घातल्यानंतर मुदत संपलेल्या बिस्किटांची पाकिटे त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. संतप्त जमावाने त्या अधिकाऱ्याभोवती गर्दी केली आणि "हे तुम्हीच खा!, तुमच्या मुलाला खाऊ घालाल का?" असं सांगितलं. दुकानदाराला वाचवण्यासाठी त्यांनी लाच घेतल्याचा आरोप जमावाने केला. दुकानदाराची पाठराखण करत असल्याच्या आरोपांदरम्यान, काही जणांनी ती खराब झालेली बिस्किटे बळजबरीने एफडीए अधिकाऱ्याच्या तोंडात कोंबण्याचा प्रयत्न केला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली.
समजून घ्या संपूर्ण प्रकरण

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, दुकानातून विकत घेतलेला फरसाण पुडा खाल्ल्यानंतर एका दोन वर्षांच्या मुलाला चक्कर येऊ लागली आणि त्याची प्रकृती बिघडली. मुलाची प्रकृती खालावल्यामुळे कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले. या घटनेमुळे मुलाचे नातेवाईक आणि इतर रहिवाशांमध्ये संताप निर्माण झाला आणि तक्रार नोंदवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधला.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर, अन्न व औषध प्रशासनाच्या  एका अधिकाऱ्याने पाहणीसाठी दुकानाला भेट दिली. मात्र, संबंधित स्नॅक मिक्सचे पुडे पाहणी सुरू होण्यापूर्वीच दुकानातून हटवण्यात आले होते, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला.

तपासणीदरम्यान सापडले एक्स्पायर्ड बिस्किट
तपासणीदरम्यान, संबंधित अधिकाऱ्याला दुकानात मुदत संपलेल्या बिस्किट्सची मोठी खेप विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. स्थानिकांचा असा आरोप आहे की, अधिकाऱ्याने मुदत संपलेला माल जप्त केला असला तरी, दोषी दुकानदारावर कोणतीही ठोस किंवा कठोर कारवाई करण्यात आली नाही. त्यानंतर, संतप्त जमावाने त्या अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले; हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी आणि दुकानदाराला वाचवण्यासाठी त्याने लाच घेतल्याचा आरोप त्यांनी केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.