राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मंत्रालयातील खानावळीपासून ते अनेक शहरांमधील हॉटेल्सवर धाडी टाकत एफडीएने तपासणी करत अनेकांचे परवाने रद्द केले आहेत. आता FDA ने थेट सत्ताधारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीसाठीच्या जेवणाचीही तपासणी केल्याचे माहिती समोर आली आहे.
पुण्यात सोमवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित आहेत. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात सुरू असलेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रविंद्र यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जेवणाची खास व्यवस्थाही करण्यात आली आहे.बैठक सुरू असतानाच FDA च्या पथकाने अचानक भेट देत जेवणाची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. पथकाने जेवणाचे नमुने घेतल्याने भाजपच्या बैठकीपेक्षा सध्या 'त्या' जेवणाच्या सॅम्पलचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, FDA चे चार कर्मचारी बैठकीच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी जेवणाची तपासणी करत अन्नपदार्थांचे नमुने घेतल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात सध्या अन्न भेसळीविरोधात FDA कडून तपासणी आणि कारवाई सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकीतील जेवणाची झालेली तपासणी चर्चेचा विषय ठरली आहे. या नमुन्यांमध्ये नेमके काय आढळले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी याच ठिकाणी जेवण करणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अन्नाची तपासणी करण्यात आली असावी, अशी चर्चा आहे.
भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांनीही FDA चे अधिकारी येऊन तपासणी करून गेल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी अन्नपदार्थांचे नमुने घेतले असून, तपासणीदरम्यान त्यांना काही आक्षेपार्ह आढळले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. बैठकीला केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा प्रभारी, विविध मोर्चांचे पदाधिकारी, मंडल अध्यक्ष तसेच माजी खासदार आणि माजी आमदार उपस्थित राहणार आहेत.
आगामी संघटनात्मक वाटचाल, राजकीय आणि सामाजिक विषयांवर या बैठकीत चर्चा होणार असून काही ठरावही मांडले जाण्याची शक्यता आहे. बैठकीच्या समारोपाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, या सर्व राजकीय चर्चांबरोबरच भाजपच्या बैठकीच्या ठिकाणी FDA पथकाने केलेली अन्नपदार्थांची तपासणी आणि घेतलेले सॅम्पल सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.