ट्रेनी आयपीएस अधिकारी आणि दोन पोलिसांवर लाच घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. सायबर फसवणूक प्रकरण मिटवण्यासाठी एक कोटी रुपयाची लाच मागितली आणि ती घेतली होती. या प्रकरणी आता दिल्लीच्या स्पेशल सीबीआय कोर्टात सुनावणी सुरू आहे. छत्तीसगड पोलिस महासंचालक, सीबीआयचे संचालक यांच्याकडे अॅक्शन टेकन रिपोर्ट मागण्यात आला आहे. छत्तीसगढ कॅडरमधील २०२०च्या बॅचचा ट्रेनी आयपीएस अधिकारी आणि दोन पोलीस कर्मचारी यात अडकले आहेत.
ट्रेनी आयपीएस अधिकारी राहुल बन्सल, सहाय्यक उपनिरीक्षक प्रवीण कुमार राठोड, कॉन्स्टेबल अंशुल शर्मा अशी अधिकाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदाराने कोर्टासमोर लाचेच्या रकमेच्या व्यवहाराचे पुरावे सादर केले होते. यात व्हॉटसअप चॅट आणि कॉल रेकॉर्डिंगचा समावेशही आहे. पुराव्याच्या आधारे कोर्टाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सविस्तर अहवाल मागवला आहे. यात आतापर्यंत केलेल्या कारवाईची पूर्ण माहिती मागवण्यात आलीय.
राहुल बन्सल आयपीएस होण्याआधी इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. आयपीएस ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांचं पोस्टिंग छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यात सीएसपी म्हणून झालं होतं. पहिल्या पोस्टिंगवेळीच सायबर गुन्ह्याच्या प्रकरणात एक कोटीची लाच मागितली होती. ही रक्कम घेतल्याचा दावाही तक्रारदाराने केलाय.
तक्रारदाराने म्हटलं की, एक कोटी रुपये एकावेळी दिले नव्हते. तर मे २०२६ मध्ये दोन हफ्त्यात ५० - ५० लाख रुपये हवाला चॅनेलच्या माध्यमातून पाठवले होते. या व्यवहाराबाबात आरोपींशी झालेल्या चर्चेचे डिजिटल पुरावेसुद्धा कोर्टात देण्यात आले आहेत. कोर्टाने या पुराव्यांचीही दखल घेतली आहे.दिल्लीच्या स्पेशल सीबीआय कोर्टाने या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत छत्तीसगढ पोलीस महासंचालक आणि सीबीआय संचालक यांच्याकडे सविस्तर अहवाल मागितला आहे. या अहवालातून तक्रार मिळाल्यानंतर आरोपी अधिकाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई केली हे स्पष्ट होणार आहे. आरोपींची चौकशी सुरू आहे की नाही, कोणत्या पातळीवर चौकशी केली जात आहे आणि काय कारवाई केली हे समजू शकणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.