राष्ट्रपतींच्या ADC पदासाठी 'विवाह'बंदी! जाणून घ्या कठीण निवड प्रक्रिया
वयाच्या ३०व्या वर्षी मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी राष्ट्रपतींच्या एडीसी सारख्या प्रतिष्ठीत पदाचा राजीनामा दिला आहे. इतक्या कमी वयात राजीनामा दिल्यानं मेजर ऋषभ चर्चेत आले आहेत. आता त्यांनी एका पॉडकास्टमध्ये एडीसी पोस्टबाबत आणि त्यांची पात्रता, निवड प्रक्रिया याची माहिती दिलीय.
एडीसी म्हणजे एड डी कँप टू द प्रेसिडंट ऑफ इंडिया. राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी एडीसीवर असते. त्यांची सावली बनून सतत सोबत रहावं लागतं.
एडीसीची सर्विस फक्त एक ड्युटी नसते तर विश्वासाचं नातं बनते. देशाच्या राष्ट्रपतींसोबत असताना सतर्क राहण्याची आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची तयारी असावी लागते. राष्ट्रपतींचे अधिकृत कार्यक्रम, सोहळे, प्रवास दौरे आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमात सोबत रहावं लागतं.
राष्ट्रपतींच्या एडीसी पदाची निवड थेट होत नाही. यात लष्कर, नौदल आणि हवाई दलातील कमिशंड अधिकारीच एडीसी बनू शकतात. त्यासाठी युपीएससी एनडीए, युपीएससी सीडीएस भरती परीक्षा असतात. एनडीएची परीक्षा १२वी नंतर तर सीडीएसची परीक्षा पदवीनतर देता येते.
शॉर्ट लिस्टिंग
तिन्ही दलातून योग्य अधिकाऱ्यांची यादी तयार केली जाते. यात किमान ५ ते ७ वर्षे सेवा दिलेले अधिकारी असतात. यासाठी सर्विस ब्रॅकेट, वयोमर्यादा, शारीरिक निकष, गोपनीय अहवाल, मेरिट, कोर्स परफॉर्मन्स आणि फीडबॅक यांचा आधार घेतला जातो. जवळपास २० ते ३० अधिकारी निवडले जातात.
मुलाखत
शॉर्टलिस्ट झालेल्या अधिकाऱ्यांची त्यांच्या संबंधित मुख्यालयात मुलाखत होते. यात चालू घडामोडी, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय मुद्दे आणि परिस्थितीशी संबंधित प्रश्न विचारले जातात. या मुलाखतीच्या आधारे पुढच्या टप्प्यासाठी ५ जणांची निवड होते.
राष्ट्रपती भवनात १४ दिवस मुलाखत
दुसऱ्या टप्प्यात शॉर्टलिस्ट केलेल्या ५ अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावलं जातं. तिथं राष्ट्रपती भवनात जवळपास १४ दिवस मुलाखत होते. वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि राष्ट्रपतींच्या सचिवांकडून या मुलाखती होतात. या १४ दिवसात अधिकाऱ्यांना त्यांच्यातील उणीवा किंवा त्रुटी सांगितल्या जात नाहीत. त्यांना स्वत:च चुका सुधाराव्या लागतात. १४ दिवसात अनेकदा २-३ तास मुलाखत होते. वेगवेगळ्या परिस्थिती कसे काम केले जाते हे पाहिले जाते.
चारित्र्य आणि पार्श्वभूमी
निवड प्रक्रियेवेळी अधिकाऱ्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, शालेय शिक्षण, भूतकाळातलं वर्तन आणि चारित्र्य याची चौकशी केली जाते.
अंतिम निवड
१४ दिवसांच्या मुलाखतीनंतर आणि चौकशीनंतर फक्त एकाच अधिकाऱ्याची निवड राष्ट्रपतींचे एडीसी म्हणून केली जाते. राष्ट्रपतींच्या एडीसी पदासाठी निवडण्यात येणारे उमेदवार हे अविवाहितच असतात. त्यांना या पदावर असताना लग्न करता येत नाही. कुटुंबापासून दूर रहावं लागतं. एक प्रकारे खासगी आयुष्याचा त्याग करावा लागतो असंही मेजर ऋषभ सांब्याल यांनी सांगितलंय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.