🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

७० कोटींची बनावट नाणी जप्त: मध्यरात्री छापा मारून पोलिसांकडून 'मिनी रिझर्व्ह बँक' उद्ध्वस्त

७० कोटींची बनावट नाणी जप्त: मध्यरात्री छापा मारून पोलिसांकडून 'मिनी रिझर्व्ह बँक' उद्ध्वस्त

सहारनपूर : पंजाब नॅशनल बँकेच्या करन्सी चेस्टमधून 17.29 कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील सहारनपूर पोलिसांनी बनावट नाण्यांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

पोलिसांनी 70 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बनावट नाणी बाजारात चलनात आणल्याचा दावा करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा छडा लावला असून या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे.

सहारनपूरच्या तीतरों परिसरात बनावट नाणी तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर कोतवाली नगर पोलीस, एसओजी, स्वाट आणि सर्व्हिलन्सच्या संयुक्त पथकाने कारवाई करत या कारखान्याचा पर्दाफाश केला. पोलिसांनी घटनास्थळावरून 20 रुपयांची 6,400 तयार बनावट नाणी जप्त केली. या नाण्यांची किंमत सुमारे 1.28 लाख रुपये आहे. याशिवाय जवळपास 5 लाख रुपयांची अधबनलेली नाणीही पोलिसांच्या हाती लागली आहेत.

रोज 10 ते 12 हजार बनावट नाणी तयार

सहारनपूरचे एसएसपी अभिनंदन सिंह यांनी रविवारी पोलीस लाइन सभागृहात पत्रकार परिषद घेत या कारवाईची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही टोळी सहा मशीनच्या मदतीने दररोज 10 ते 12 हजार बनावट नाणी तयार करत होती.

एका नाण्याच्या निर्मितीसाठी टोळीला साधारण 5 ते 6 रुपये खर्च येत होता. त्यानंतर ही नाणी एजंटना 12 ते 15 रुपये दराने विकली जात होती. एजंटांच्या माध्यमातून ही बनावट नाणी पुढे विविध ठिकाणी कमिशनच्या माध्यमातून बाजारात चलनात आणली जात होती.

पोलिसांच्या माहितीनुसार दारूची दुकाने, टोल प्लाझा आणि किराणा दुकानं ही बनावट नाणी खपवण्यासाठी प्रमुख ठिकाणं होती. यामध्ये दारूची दुकाने या टोळीच्या दृष्टीने महत्त्वाचा बाजार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मुख्य आरोपी 2001 पासून या धंद्यात

पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी उपकार लूथरा उर्फ अभय प्रताप सिंह, जो पंजाबमधील मोहालीचा रहिवासी आहे, याच्यासह हिमांशु उर्फ गुल्लू, कुलदीप, संतोष चौरसिया उर्फ जनार्धन आणि अनुराग पाल उर्फ लंकेश यांना अटक केली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपी उपकार 2001 पासून बनावट नाणी तयार करण्याच्या या व्यवसायात सक्रिय होता. २०१७ मध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर असताना अटक केली होती. तपासादरम्यान या टोळीचे नेटवर्क केवळ उत्तर प्रदेशापुरतं मर्यादित नसून पंजाब, बिहार, भदोही, बदायूं आणि पश्चिम उत्तर प्रदेशापर्यंत पसरलेलं असल्याचं समोर आलं आहे.

8 मोबाइल, 59 डाय आणि सात रजिस्टर जप्त

पोलिसांनी आरोपींकडून 8 मोबाइल फोन, 59 डाय, सात हिशोबाची रजिस्टर आणि इतर कागदपत्रं जप्त केली आहेत. या साहित्याच्या आधारे बनावट नाण्यांच्या संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास केला जात आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणकोणाचा सहभाग आहे आणि बनावट नाणी नेमकी कोणत्या भागांमध्ये आणि कोणत्या माध्यमातून पोहोचवली जात होती, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींच्या मालमत्तांचीही चौकशी केली जाणार आहे.

17.29 कोटींच्या बनावट नोटांनंतर 70 कोटींच्या नाण्यांचा खुलासा

सहारनपूरमध्ये काही काळापूर्वी 17.29 कोटी रुपयांच्या बनावट चलनी नोटांशी संबंधित प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर आता 70 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बनावट नाण्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने हे प्रकरण पोलिसांसाठी महत्त्वाचं मानलं जात आहे.

चौकशीदरम्यान टोळीने आतापर्यंत 70 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बनावट नाणी बाजारात चलनात आणल्याची माहिती दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे या बनावट नाण्यांच्या प्रकरणाचा आणि आधी उघडकीस आलेल्या 17.29 कोटी रुपयांच्या बनावट नोटांच्या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचाही तपास केला जाऊ शकतो.

सहारनपूरमध्ये मोठं उत्पादन केंद्र उभारण्याची तयारी

पोलिसांच्या तपासानुसार, या टोळीने तीतरों परिसरात बनावट नाणी तयार करण्यासाठी नवीन ठिकाण उभारलं होतं. या ठिकाणी सहा मशीनच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू होतं.

सहारनपूरला भविष्यात बनावट नाण्यांचं मोठं उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याची या टोळीची तयारी असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या मशीन आणि नाणी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 59 डाय या रॅकेटचा विस्तार किती मोठा होता, याचे संकेत देत आहेत.

एसएसपी अभिनंदन सिंह यांनी सांगितलं की, बनावट नाणी तयार करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या पाच सदस्यांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी आतापर्यंत 70 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बनावट नाणी बाजारात चलनात आणल्याचं चौकशीत समोर आलं आहे. आरोपींकडून 6,400 बनावट नाणी, सहा मशीन आणि नाणी तयार करण्यासाठी लागणारं इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.