रेल्वेने चाललीय 'सुगंधित' तस्करी! मिरजेत गुटक्याचा मोठा साठा जप्त; तुकाराम मुंढेंच्या धाकामुळे तस्करांचे धाबे दणाणले
मिरज :- गणेशोत्सवाच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात गुटखा तस्करांनी आपला मोर्चा आता रेल्वे वाहतुकीकडे वळवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. मिरज रेल्वे पार्सल ऑफिसमध्ये संशयास्पद रित्या आलेल्या गुटक्याच्या पोत्यांवर प्रशासनाने टाच आणत हा बेकायदेशीर साठा ताब्यात घेतला आहे.
मथुरेहून सुटणाऱ्या 'योगनगरी एक्सप्रेस'मधून या गुटक्याच्या गोण्या मिरजेत आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस या रॅकेटचा कसून तपास करत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाची रस्त्यांवर कडक नाकाबंदी असते. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी तस्करांनी रेल्वेचा सुरक्षित मार्ग म्हणून वापर सुरू केल्याचे या कारवाईवरून उघड झाले आहे.
मुंढेंच्या कारवाईचा दणका, तस्करांची गुप्त वाट!
राज्यस्तरीय ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून बेकायदेशीर धंद्यांविरोधात जोरदार मोहिमा उघडल्या आहेत. त्यांच्या या धडाकेबाज कामगिरीच्या धाकाने तस्करांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वी गुप्तपणे चालणारी ही तस्करी रस्त्यांवरून उघडी पडू लागल्याने तस्करांनी आता रेल्वे पार्सल सेवेचा सहारा घेतला असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
वर्षानुवर्षे सुरू असलेली तस्करी अखेर चव्हाट्यावर
"हा प्रकार आजचा नाही, रेल्वे पार्सलच्या माध्यमातून अशा प्रकारची गुटखा तस्करी याआधीही अव्याहतपणे सुरू होती," अशी धक्कादायक माहिती स्थानिक वर्तुळातून दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. मात्र, यावेळी प्रशासनाला मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे हा साठा एन गणेशोत्सवाच्या तोंडावर पकडण्यात यश आले आहे.
तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान
मुख्य सूत्रधार कोण? मथुरेवरून हा माल कोणी बुक केला आणि मिरजेत हा साठा स्वीकारण्यासाठी कोण येणार होते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. रेल्वे प्रशासनाची भूमिका: पार्सल विभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंदी असलेला माल तपासणीशिवाय कसा बाहेर आला, यात कोणाचे साटेलोटे आहे का, याचाही तपास होणे गरजेचे आहे. सध्या अधिकृत सूत्रांनी या कारवाईला दुजोरा दिला असून, याप्रकरणी मुख्य तस्करांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस आणि महसूल यंत्रणा वेगाने पावले उचलत आहेत. या कारवाईमुळे सांगली-मिरज परिसरातील गुटखा माफियांचे धाबे पुरते दणाणले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.