वर्धा : राज्यात सध्या आंदोलनाच्या माध्यमातून विविध विषयांना वाचा फोडण्यात येत आहे. सरकार, प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी जनता आंदोलनाचा वापर करत आहे. पण केवळ लोकच नाही तर खासदारही आता याच आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे.
कारण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे हे गेल्या सहा दिवसांपासून आंदोलनाला बसले आहेत. आंदोलनाला बसलेल्या काळेंची पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज मंगळवारी (15 सप्टेंबर) भेट घेतली. मात्र, काळे करत असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून अजूनही तोडगा न निघाल्याने आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
नेमके प्रकरण काय?
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील रायपूर जंगली या गावात 9 सप्टेंबरला भगवान चंद्रभान धुर्वे या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सायंकाळी ही घटना उजेडात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मृतदेहाचे शवविच्छेदन करून त्यास गावात पाठविण्यात आले अंत्य संस्कारासाठी मदत म्हणून शासनाचे 25 हजार रुपये पीडित कुटुंबाने स्वीकारले. मात्र नंतर पीडित कुटुंबातील एकास नोकरी व 1 कोटी रुपये नुकसान भरपाई अशी मागणी गावाकऱ्यांनी रेटून धरली. परंतु, अद्यापही शासनाने याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याने पीडित कुटुंबियांकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर, त्यांच्या या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदार अमर काळे यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे. ते सुद्धा गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन करत असल्याने या आंदोलनाला राजकीय स्वरूप मिळाले आहे.
खासदार अमर काळे हे देखील गेल्या सहा दिवसांपासून कुटुंबीयांसोबत आंदोलनात सहभागी आहेत. त्यामुळे या आंदोलनाला राजकीय पाठबळ मिळाले असून प्रशासनावर मागण्या मान्य करण्यासाठी दबाव वाढला आहे. आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी रायपूर येथे जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी पीडित कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, काँग्रेसचे उदय मेघे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मागण्यांवर चर्चा सुरू आहे. मात्र, चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही अपेक्षित तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तर, जिल्हाधिकारी वान्मती सी. यांनी पत्रकार परिषदेत प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली होती. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भगवान धुर्वे यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार मदत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गावातील परिस्थिती सुधारण्यासाठी संबंधित विभागांकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामस्तरीय समिती, स्थानिक नागरिक, नातेवाईक आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींशी प्रशासन सातत्याने संवाद साधत असून, ग्रामस्थांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. वन विभागाकडून कुटुंबातील एका व्यक्तीला कंत्राटी वाहनचालक किंवा वनमजूर म्हणून रोजगार देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.