बेळगाव : घरातल्या फ्रिजचा स्फोट झाल्यानं एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास कर्नाटकच्या बेळगावात ही दुर्घटना घडली.
या घटनेची माहिती पोलिसांकडून मंगळवारी देण्यात आली. भारती धमोने (५०), शारदा धमोने (४५), गंगा धमोने (२५) आणि प्रिया धमोने (२४) यांचा फ्रिजच्या स्फोटात जागीच मृत्यू झाला. तर गजानन धमोने (६५) आणि रोशन धमोने (२१) गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शारदा या गजानन यांच्या पत्नी होत्या. तर भारती त्यांची बहीण होती. प्रिया आणि गंगा या गजानन आणि शारदा यांच्या लेकी होत्या. तर रोशन त्यांचा लेक आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात असलेल्या फ्रिजचा स्फोट झाल्यानं आग लागली. बघता-बघता संपूर्ण घरात आगीच्या ज्वाळा पसरल्या. त्यामुळे कुटुंबातील सदस्य आतच अडकले. धमोने कुटुंबाच्या घरी सोमवारी गणरायाचं आगमन झालं होतं. रात्री जेवल्यावर संपूर्ण कुटुंब झोपलं.
धमोने कुटुंबाच्या शेजाऱ्यांनी मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास स्फोटाचा मोठ्ठा आवाज ऐकला. शेजारीपाजारी मदतीसाठी धावले. गजानन आणि रोशन यांना बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. पण अन्य चार सदस्यांचा आगीत मृत्यू झाला. गजानन आणि रोशन आगीत ६० टक्के भाजले आहेत.धमोने यांच्या घराचा पत्रा स्फोटामुळे मोडला आहे. बहुतांश मौल्यवान वस्तू जळून गेल्या आहेत. फ्रिजच्या स्फोटामुळे दुर्घटना घडल्याचं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. स्फोट कशामुळे झाला, याचा शोध घेतला जात आहे. घरात आणलेल्या गणपतीच्या मूर्तीभोवती लाईट्स लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना शॉर्ट सर्किट झाल्याची शक्यता वाढते.
गजानन धमोने सुतारकाम करायचे. कुटुंबातील अन्य सदस्य मेहनत, मजुरी करायचे. त्यांनी मोठ्या भक्तीभावानं घरात गणपती बाप्पाची मूर्ती आणली होती. पण गणेश चतुर्थीच्या रात्रीच कुटुंबावर विघ्न आल्यानं नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली. या दुर्घटनेचा तपास मार्केट पोलीस ठाण्याकडून केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.