🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही'; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

'पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही'; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

पुणे - 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी माझ्याविरोधात सातत्याने वैयक्तिक आणि प्रतिमा मलिन करणारे राजकीय आरोप केले जात आहेत. औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचा घटनाक्रम माझ्या पदभार स्वीकारण्यापूर्वीचा आहे.

या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच आयोगाने पोलिसांत तक्रार केली असून, तपास सुरू आहे, असे एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी स्पष्ट केले. तसेच 'माझ्याविरोधात कुणी एक जरी पुरावा दिला, तर एक क्षणही या पदावर राहणार नाही,' असेही भीमनवार यांनी सांगितले आहे.

एमपीएससीतील कथीत पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणी पुण्यात सोमवारी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातर्फे 'विद्यार्थी आक्रोश मोर्चा' काढण्यात आला. यावेळी एमपीएससीचे अध्यक्ष यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर भीमनवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

भीमनवार म्हणाले, 'पदभार स्वीकारल्यानंतर आयोगाच्या कामकाजात अनेक गुणात्मक आणि रचनात्मक सुधारणा केल्या आहेत. आतापर्यंत स्पर्धा परीक्षांच्या आठ आणि सरळसेवा भरतीच्या ७६ चाळणी परीक्षा अशा एकूण ८४ परीक्षा यशस्वीपणे घेण्यात आल्या. निकाल प्रक्रियेतील विलंब कमी करून १८ ते २१ दिवसांत निकाल जाहीर करणे शक्य झाले असून, पुढे एका महिन्यात निकाल जाहीर करण्याचे नियोजन आहे.'

'भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आयोगाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून, राज्य सरकारनेही उच्चाधिकार समिती गठित केली आहे,' असेही भीमनवार यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.