'राज'पुत्राला पोलिसांचा दणका, मोदींचा फोटो हटवणे पडले महागात; गुन्हा दाखल
पुणे :-सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील प्राचार्यांच्या दालनात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी लावण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मनसे नेते अमित ठाकरे यांनी हटवायला लावला.
या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या समस्या आणि शैक्षणिक सुविधांची पाहणी करण्यासाठी अमित ठाकरे यांनी सोमवारी शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयाला भेट दिली. पाहणीनंतर ते प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांच्या कार्यालयात गेले. तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी पंतप्रधान मोदी यांचा फोटो असल्याचे एका विद्यार्थ्याने त्यांच्या निदर्शनास आणून दिले. ते पाहून संतप्त झालेल्या अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला असे म्हणत, फोटो काढण्यास सांगितले. कार्यकर्त्यांनी लगेचच मोदींचा फोटो काढून टाकला.
चौकशीसाठी बोलावले जाणार
प्राचार्य पाटील यांनी या प्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याआधारे अमित ठाकरे यांच्यासह 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयात बेकायदेशीररीत्या प्रवेश करून घोषणाबाजी, दमदाटी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून अमित ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त चिलुमूला रजनीकांत यांनी सांगितले.
हा खराब कांदा तुम्ही खाणार का?
महाविद्यालयाच्या कँटिनमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट जेवणाचे फोटो दाखवत अमित ठाकरे यांनी प्राचार्य पाटील यांना जाब विचारला. विद्यार्थ्यांना असे जेवण मिळणार असेल तर ते आधी तुम्हाला खावे लागेल. खराब कांद्यांचा पॅरेट प्राचार्यांच्या टेबलवर आपटून हा खराब कांदा तुम्ही खाणार का, असा सवालही अमित ठाकरे यांनी केला. इतरही अनेक समस्यांकडे त्यांनी प्राचार्यांचे लक्ष वेधले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.