🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘लोकशाहीचा एवढाच पुळका तर नागपूरच्या संघ मुख्यालयात कुणाल कामराचा शो ठेवून दाखवा!’; ध्रुव राठीचे थेट मोहन भागवतांना धडक आव्हान

‘लोकशाहीचा एवढाच पुळका तर नागपूरच्या संघ मुख्यालयात कुणाल कामराचा शो ठेवून दाखवा!’; ध्रुव राठीचे थेट मोहन भागवतांना धडक आव्हान

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्क येथे पार पडलेल्या कार्यक्रमावर यूट्यूबर ध्रुव राठीने भाष्य केले आहे. ध्रुव राठीने भागवतांच्या या कार्यक्रमाला न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांच्यासह इतरांनी देखील विरोध केल्याचे नमूद केले.

राठीने लोकशाहीवर तुमचा विश्वास आहे का? असा सवाल करत "लोकशाहीवर विश्वास आहे तर संघाच्या मुख्यालयात कुणाल कामराचा शो ठेवा", असे आवाहन भागवतांना केले.

ध्रुव राठीचा व्हिडीओ

न्यूयॉर्कमध्ये शनिवारी 'अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग' या संस्थेच्या वतीने आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवतांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला अनेकांनी विरोध दर्शवला तसेच अनेकांकडून टीकाही करण्यात आली. याचाच संदर्भ ध्रुव राठीने मोहन भागवत यांच्या या कार्यक्रमाला उद्देशून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. "न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांची विचारसरणी तुमच्या विचारसरणीविरुद्ध आहे याबाबत त्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगितले. पण, एका स्वतंत्र आणि लोकशाही देशात खासगी कार्यक्रम रोखणे अयोग्य आहे," असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे राठी त्याच्या व्हिडीओत मोहन भागवत यांना उद्देशून बोलताना म्हणाला.

काय म्हणाला ध्रुव राठी?

ध्रुव राठीने यानंतर भागवतांना अमेरिकन लोकशाहीच्या तत्त्वांवर विश्वास आहे का? असा प्रश्न विचारला. "ही अमेरिकेची लोकशाही आहे, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. मला तुम्हाला विचारायचंय, तुमचा या लोकशाहीवर विश्वास आहे का?", असे राठी म्हणाला. संघ परिवाराशी संबंधित लोकांनी अनेकवेळा दबावाच्या माध्यमातून खासगी कार्यक्रम बंद पाडल्याचा आरोप पुढे राठीने केला. "भारतात, संघ परिवाराशी निगडीत लोक अनेकदा गुंड लोकांना धमकावून, भीती दाखवून खासगी कार्यक्रम बंद पाडतात," असा आरोप राठीने केला.

कुणाल कामराच्या शोचे उदाहरण

राठीने व्हिडीओत पुढे विनोदी कलाकार कुणाल कामराचे उदाहरण दिले. "कुणाल कामराचेच उदाहरण घ्या. आरएसएसशी संबंधित लोकांच्या दबावामुळे त्यांचे किती शो रद्द झाले? मी अशा सर्व लोकांच्या वतीने बोलत आहे ज्यांची विचारसरणी तुमच्याशी जुळत नाही. तुमचा लोकशाही आणि स्वातंत्र्यावर विश्वास असेल, तर कुणाल कामराला त्याचा शो करू द्या. मी तर म्हणेन की, कुणाल कामराला नागपूरला आमंत्रित करा आणि तिथे त्याच्या कॉमेडी शोचे आयोजन करा. हे आयोजन आरएसएस मुख्यालयात करा. आरएसएस प्रमुख म्हणून तुमच्याकडे ती ताकद आहे," असे ध्रुव राठी म्हणाला.

भागवतांना आवाहन

"तुम्ही असे केले नाही, तर देशातील तरुणांना हे समजेल की तुमच्यासारखे लोक दांभिक आहेत; तुम्ही अमेरिकेत स्वातंत्र्याचा फायदा घेता, पण भारतात मात्र तेच स्वातंत्र्य आपल्याच लोकांना देऊ इच्छित नाही. त्यामुळे यावर शांतपणे विचार करा आणि निर्णय घ्या. तुम्ही लोकशाहीच्या बाजूने आहात की गुंडगिरीच्या बाजूने? धन्यवाद," असे म्हणत राठीने व्हिडीओचा शेवट केला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.