महाराष्ट्रातील दोन कोटी मतदार उडवले! 'एसआयआर'ची कमाल! निवडणूक आयोगाची धमाल!!
राज्य निवडणूक आयोगाने एसआयआर मोहीम राबवून तयार केलेली प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध केली. ही यादी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या यादीमध्ये तब्बल 2 कोटी 7 लाख मतदारांची नावे उडवली गेली आहेत.
त्याची विविध कारणे आयोगाने दिली असून या प्रारुप यादीत नावे नसलेल्या मतदारांना पुन्हा नव्याने नोंदणी करण्याचा उपद्व्याप करावा लागणार आहे.
एसआयआर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राज्यात 9 कोटी 78 लाख 54 हजार 49 मतदार होते. आजच्या प्रारुप मतदार यादीमध्ये त्यातील 78.86 म्हणजे 7 कोटी 71 लाख 65 हजार 562 मतदारांचा समावेश झाला आहे. 2 कोटी 6 लाख 88 हजार 487 मतदार म्हणजेच 21.14 टक्के मतदार एसआयआरमधून वगळले गेले आहेत. सर्वाधिक 28.66 लाख एवढे मतदार पुणे जिह्यातून वगळण्यात आले आहेत.
यादीत नाव समाविष्ट करण्यास हे पुरावे आवश्यक
2002 पूर्वीची मतदार यादी किंवा जुनी निवडणूक पावती, मालमत्तेची कागदपत्रे, भाडेकरू असल्याच्या नोंदी, नागरिकत्व/ रहिवासी/निर्वासित नोंदणी प्रमाणपत्र, पासपोर्ट, एलआयसी पॉलिसी, शासनाने दिलेला अधिकृत परवाना/प्रमाणपत्र, शासकीय किंवा निमशासकीय नोकरीचे प्रमाणपत्र, बँक, पोस्टाचे पासबुक, जन्म दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, कोर्टाच्या नोंदी किंवा कायदेशीर कागदपत्रे, रेशन कार्ड, शासकीय ओळखपत्र.
नाव समाविष्ट करण्यासाठी – अर्ज 6
अपात्र वा मृत व्यक्तीचे नाव यादीत असल्यास आक्षेप घेण्यास – अर्ज 7
दुरुस्ती किंवा पत्ता बदलण्यासाठी – अर्ज 8
प्रारुप यादी
पुरुष मतदार – 3 कोटी 95 लाख 89 हजार 905
महिला मतदार – 3 कोटी 75 लाख 72 हजार 570
तृतीयपंथीय मतदार – 3 हजार 87
वगळलेले मतदार
अनुपस्थित, आले नाहीत – 75 लाख 52 हजार
कायमस्वरुपी स्थलांतरित – 76 लाख 80 हजार
मृत्यू झालेले मतदार – 34 लाख 81 हजार
दुबार मतदार – 17 लाख 63 हजार
इतर कारणास्तव वगळलेले – 2 लाख 13 हजार
बीएलओने एका घरी तीन वेळा भेट देणे अपेक्षित होते
बीएलओ घरोघरी न फिरता सोसायटय़ांची कार्यालये आणि पक्ष कार्यालयांमध्येच गेले, अशा तक्रारी आहेत. यासंदर्भात बोलताना चोक्कलिंगम म्हणाले की, एसआयआर नोंदणीसाठी नेमलेल्या बीएलओना प्रत्येक मतदाराच्या घरी किमान एक वेळा भेट देण्याचे आणि संबंधित व्यक्ती भेटला नाही तर तीन वेळा भेट देण्याचे निर्देश देण्यात आले होते, इतकेच नव्हे तर आवश्यकतेनुसार पात्र मतदारांकडून फॉर्म 6 किंवा 8 घेण्याचे निर्देश देण्यात आले होते, असे चोक्कलिंगम यांनी सांगितले.
एका महिन्यात पुन्हा नोंदणी करा
मतदारांनी प्रारुप मतदार यादी पाहून त्यात आपले नाव आहे की नाही हे तपासावे आणि नसल्यास समावेश करण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले आहे.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या याद्या देण्यात आल्या आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती लक्षात घेतल्या जाणार आहेत.
मतदारांनी अर्ज भरून आपले नाव यादीत समाविष्ट करून घ्यावे तसेच माहितीमध्ये काही दुरूस्ती असेल तर त्यासाठीही मागणी करावी, असे चोक्कलिंगम यांनी म्हटले आहे.
29 ऑक्टोबरपर्यंत या सर्व अर्जांचा निपटारा करून 4 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारुप मतदार यादीमध्ये नाव तपासण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱयांच्या वेबसाईटवर किंवा निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या पोर्टलला भेट द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.