जनतेचा खिसा रिकामा, 'महायुती'चा महापंचपक्वान्न! मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांवर २१ कोटी ताटात; गरिबांच्या पोटावर पाय!
मुंबई :-साखरेपासून तेल-तूप तांदूळ आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. गॅस सिलिंडरच्या दरवाढीने सामान्य माणूस गॅसवर असताना गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवरील अतिथींच्या जेवणावळींवर तब्बल 21 कोटी रुपयांची उधळण झाल्याची धक्कादायक माहिती 'आरटीआय'मधून पुढे आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शासकीय खानपानावर तब्बल 12 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाला आहे.
सामान्य प्रशासन विभागाने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'नंदनवन' आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या 'देवगिरी' या मुंबईतील शासकीय निवासस्थानी येणाऱया अभ्यागतांचे, पाहुण्यांचे स्वागत, आदरातिथ्य करण्यासाठी सुखसागर हॉस्पिटॅलिटी सर्विसेस या सेवा पुरवठादाराची चार वर्षांसाठी निवड केली आहे. त्यासाठी दरवर्षी 9 कोटी 85 लाख तर पुढील चार वर्षांत जवळपास 40 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर सन 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी खानपान सेवेवर झालेल्या खर्चाबाबत माहितीच्या अधिकारात सामान्य प्रशासन विभागाने दिलेली खर्चाची आकडेवारी डोळे पांढरे करणारी आहे. मुंबईशिवाय नागपूर येथील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी तसेच दिल्लीतील महाराष्ट्र सदनात चहापान, अल्पोपाहारावर लाखो रुपयांचा खर्च झाला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात म्हणजे 1 डिसेंबर 2023 ते नोव्हेंबर 2024 यादरम्यान 'वर्षा'वर भेटीगाठी आलेले मंत्री, खासदार, आमदार, पाहुणे आणि कार्यकर्त्यांचे चांगलेच आगतस्वागत झाल्याचे खानपानाच्या देयकांवरून दिसते. या काळात खानपानापोटी सरकारने तब्बल 5 कोटी 66 लाख 42 हजार रुपयांची देयके अदा केली आहेत. 5 डिसेंबर 2024 रोजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे यांचा मुक्काम 'नंदनवन'वर हलला. तेथेही पाहुण्यांची खातीरदारी करण्यात त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही कसूर ठेवली गेली नाही. जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 या 12 महिन्यात 'नंदनवन'च्या खानपानावर जवळपास पाच कोटी रुपये खर्च झाला आहे, तर जानेवारी 2026 ते एप्रिल 2026 या चार महिन्यांचा 'नंदनवन'चा चहा, नाश्ता, भोजनाचा खर्च पावणेदोन कोटी रुपयांच्या घरात गेला आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'सागर' या शासकीय निवासस्थानी राहत होते. डिसेंबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या 11 महिन्यांच्या कालावधीत 'सागर'वर येणाऱया पाहुण्यांच्या आदरातिथ्यावर 2 कोटी 28 लाख रुपयांहून अधिक खर्च झाल्याचे उपलब्ध कागदपत्रांतून स्पष्ट होते. तर जुलै 2025 ते नोव्हेंबर 2025 यादरम्यान 'वर्षा'वरील खानपानाचा खर्च 2 कोटी 34 लाख रुपयांपर्यंत गेला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी जुलै 2023 ते डिसेंबर 2024 यादरम्यान खानपानावर 1 कोटी 68 लाख तर जानेवारी 2025 ते जुलै 2025 या कालावधीत 75 लाख 40 हजार रुपये इतका खर्च झाला आहे. त्यामुळे 'अतिथी तुम कितना खाओगे' असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.
'वर्षा'वर महिन्यात 33 लाख खर्च
राज्यात 2024 च्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 6 डिसेंबर 2024 ते 11 डिसेंबर 2024 यादरम्यान शिंदे यांचे वास्तव्य 'वर्षा'वर होते. त्यानंतर 'वर्षा'च्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. तरीही सामान्य प्रशासन विभागाने डिसेंबर 2024 या एका महिन्याचे शासकीय खानपानाचे तब्बल 33 लाख 81 हजार रुपयांचे देयक अदा केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.