नाशिक: सुमारे २५ ते ३० हजार लोकसंख्या असणाऱ्या निफाड शहरात मोकाट कुत्र्यांची कमालीची दहशत आहे. या प्रश्नाकडे वारंवार लक्ष वेधूनही दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे) युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम रणदिवे यांनी निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलावर दोन ते तीन भटकी कुत्री सोडत गोंधळ उडवून दिला.
आंदोलनात भटक्या कुत्र्यांचा वापर झाल्याची दखल 'पेटा' संस्थेने घेतली आहे. या प्रकरणी प्राण्यांना क्रूरतेने वागवणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निफाड शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. आजवर त्यांनी अनेकांना चावा घेतला. त्यामुळे लहान मुले व महिलांमध्ये भीतीचे वातावरण असल्याकडे रणदिवे यांनी लक्ष वेधले.
निफाडची लोकसंख्या साधारणतः २५ ते ३० हजार इतकी आहे. उपजिल्हा रुग्णालयात महिन्याला १८० रेबीजची इंजेक्शने दिली जातात. खासगी रुग्णालयातील रेबीज इंजेक्शनची आकडेवारी उपलब्ध नाही. यावरून या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात येईल, असे रणदिवे यांनी म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी बैठकीत मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली होती. तेव्हा निर्बीजीकरणाची निविदा काढण्याचे नगरपंचायतीने मान्य केले होते. मात्र, बराच काळ लोटूनही कुठलीही कार्यवाही झाली नाही.
या पार्श्वभूमीवर, विक्रम रणदिवे हे समर्थकांसह निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनात धडकले. पोत्यात आणलेली कुत्र्यांची पिले त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर सोडून दिली. प्रत्येक गल्ली, चौकात आठ ते दहा मोकाट कुत्री दृष्टीस पडतात. गणेशोत्सवात लहान मुले घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून कुत्रे सोडून आणि टेबलला चलनी नोटांची माळ अर्पण करून अनोखे आंदोलन करण्यात आले. आठ दिवसांत या समस्येवर तोडगा न निघाल्यास, अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये आणि वाहनात आणखी कुत्रे सोडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
'पेटा'कडून दखल
आंदोलनात भटक्या कुत्र्यांचा वापर झाल्याच्या चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या. पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स अर्थात पेटा संस्थेने या घटनेची गंभीर दखल घेतली. पेटा संस्थेच्या प्रतिनिधींनी शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम रणदिवे यांच्याशी संपर्क साधून आंदोलनात वापरलेल्या कुत्र्यांविषयी माहिती घेतली. जिथून ही दोन लहान भटकी कुत्री आणली होती, तिथे ती सुखरूपपणे सोडल्याची माहिती आपण पेटा संस्थेला दिल्याचे रणदिवे यांनी सांगितले. प्राणीमात्रांवर आपणही दया करतो. पाळीव कुत्र्यांविषयी आपली तक्रार नसल्याचे त्यांनी नमूद केले.
पाच आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल
निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम रणदिवे, त्यांची पत्नी रुपाली रणदिवे यांच्यासह तीन साथीदारांविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागवणे, सरकारी कामात अडथळा आणणे या कलमांन्वये गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.