🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"आधी दाखला द्या, मगच सभा चालवा!" अभिजित भोसलेंचा आक्रमक पवित्रा; सांगली महापालिकेत अधिकाऱ्यांची पळापळ

​"आधी दाखला द्या, मगच सभा चालवा!" अभिजित भोसलेंचा आक्रमक पवित्रा; सांगली महापालिकेत अधिकाऱ्यांची पळापळ


सांगली : जन्माला येऊन सहा वर्षे झाली, तरी जन्मदाखला मिळाला नाही... दाखल्याअभावी शाळेतील प्रवेशाची अडचण... महापालिकेतील जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दिरंगाईचा हा प्रकार बुधवारी स्थायी समितीच्या सभेत समोर येताच लोकप्रतिनिधी संतप्त झाले.

सहा वर्षांच्या सान्वी सुनील शिंदे हिला घेऊन राष्ट्रवादीचे नगरसेवक अभिजित भोसले यांनी सभागृहात ठिय्या मांडला. नागरिकांची हेळसांड थांबवून प्रलंबित दाखले तातडीने देण्याची हमी मिळत नाही, तोपर्यंत सभा पुढे चालू देणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेत सभा रोखून धरली. 

या प्रकारामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. महापालिका क्षेत्रातील जन्म-मृत्यू दाखले मिळण्यास दिरंगाई होत आहे. सीआरएस पोर्टलमधील तांत्रिक अडचणी आणि प्रशासनाच्या विलंबामुळे नागरिकांना वारंवार पालिकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्याचे पडसाद स्थायी समितीच्या सभेत उमटले. सान्वी सुनील शिंदे या चिमुरडीला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, अद्याप तिचा जन्मदाखला मिळालेला नाही. दाखला नसल्याने तिच्या शाळेतील प्रवेशासह पुढील शिक्षणाच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होत असल्याचे नगरसेवक भोसले यांनी सभेत निदर्शनास आणून दिले. भोसले यांनी सान्वीला थेट सभागृहात आणले आणि ठिय्या आंदोलन केले.  

नागरिकांची हेळसांड थांबविण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत नगरसेवकांनी सभा रोखून धरली. लोकप्रतिनिधींच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन बचावात्मक झाले. अखेर जन्म-मृत्यू दाखल्यांच्या संपूर्ण कामकाजाचा आढावा घेऊन येत्या आठवडाभरात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. प्रलंबित दाखल्यांवर तत्परतेने कार्यवाही करून ते तातडीने देण्याचेही आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर स्थायी समितीची सभा पुन्हा सुरू झाली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.