नवी मुंबईत खाकीचा मोठा कारवाई धमाका: २६ कोटींचा अंमली साठा खाक; आयुक्त मिलिंद भारंबेंच्या काळात १.३९ अब्ज रुपयांचा ड्रग्जचा काळबाजार उदध्वस्त!
नवी मुंबई – तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीमध्ये बुधवारी (३० सप्टेंबर) दुपारी दोन वाजता विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले ७२६ किलो ग्रॅम वजनाचे तब्बल २६ कोटी ३० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या 'नशामुक्त नवी मुंबई' अभियानांतर्गत २०१ विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या या अमली पदार्थांची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे, पोलीस उपायुक्त अमित काळे, डॉ. रश्मी नांदेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे, प्रविण भगत व इतर अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली तीन वर्षे ९ महिन्यांच्या कारकिर्दीत आतापर्यंत ३९३ विविध गुन्ह्यांमधील १ अब्ज ३९ कोटी ७४ लाख रूपयांचे वेगवेगळे अमलीपदार्थ नवी मुंबई पोलिसांनी जप्त केले. नवी मुंबई पोलिसांची आजपर्यंत ही सर्वाधिक लक्ष्यवेधक कारवाई ठरली आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून अमली पदार्थांच्या विक्री, वाहतूक आणि साठवणुकीविरोधात सातत्याने कारवाई केली जात आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीन निगडे व त्यांचे पथक सातत्याने कारवाई करत आहेत.
नवी मुंबई पोलिसांनी गेल्या पाच वर्षांत अमली पदार्थांशी संबंधित २,३८७ गुन्हे दाखल करून ३,२०० संशयीत आरोपींना अटक केली. तसेच या कारवाईत १,०७८ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. अमली पदार्थांविरोधातील कारवाईबरोबरच त्याच्या दुष्परिणामांबाबत नागरिक आणि विशेषतः तरुणांमध्ये जनजागृती करण्यावर पोलिसांकडून भर देण्यात येत आहे. 'नशामुक्त नवी मुंबई' अभियानांतर्गत शहरातील शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगण्याबरोबरच त्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अमली पदार्थांबाबत माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी८८२८-११२-११२ हा हेल्पलाइन क्रमांकही सुरू केला आहे. नागरिकांना अमली पदार्थांची विक्री, साठवणूक किंवा वाहतुकीबाबतची माहिती गोपनीय पद्धतीने पोलिसांना देता येणार आहे. अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अमली पदार्थांचे सेवन आणि त्याची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांच्या कारवाईबरोबरच नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे अमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.