जतमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या २५ वर्षीय नराधमाला ४ वर्षांची सक्तमजुरी; सांगली न्यायालयाचा मोठा निकाल
जत /सांगली अल्पवयीन मुलीच्या बालवयाचा आणि विश्वासाचा गैरफायदा घेऊन तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषी ठरवण्यात आले आहे. सांगलीचे मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश (न्यायालय क्र. ४) श्रीमती जे. ए. मोहंती यांनी आरोपी जगदिश सुभाष चव्हाण (वय २५, रा. डफळापूर, ता. जत, जि. सांगली) याला ४ वर्षे सक्तमजुरी आणि एकूण ५०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
न्यायालयात चाललेल्या स्पेशल केस क्र. १७१/२०२४ (जत पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. २४९/२०२४) या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
नेमकी घटना काय?
आरोपी जगदिश चव्हाण हा पीडित अल्पवयीन मुलीच्या घराजवळ राहणारा आहे. त्याने पीडितेच्या बालवयाचा गैरफायदा घेऊन तिच्याशी जवळीक साधली व तिचा विश्वास संपादन केला. घटना घडली त्यादिवशी पीडिता आपल्या घराच्या अंगणात खेळत होती. आरोपीने 'बाजूचे घर पाहायला जायचे आहे' असे सांगून तिला फुस लावून स्वतःच्या घरी नेले आणि तेथे तिचा विनयभंग केला.
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने आरडाओरड केली आणि तेथून पडून थेट आपले घर गाठले. तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला आणि आरोपीची ओळख पटवून दिली. यानंतर पीडितेच्या वडिलांनी तात्काळ जत पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार नोंदवली.
पीडितेची धाडसी साक्ष ठरली निर्णायक
तक्रार दाखल झाल्यानंतर तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड यांनी या गुन्ह्याचा सखोल व पारदर्शक तपास करून न्यायालयात सबळ दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान प्रकरणातील इतर काही साक्षीदारांवर दबाव असल्याने त्यांनी घटनेला दुजोरा देणे टाळले. मात्र, चिमुकल्या पीडितेने अत्यंत धैर्याने न्यायालयात शपथेवर सत्य घटना विशद केली. तिची ही साक्ष आणि विश्वासार्य पुरावा या खटल्यात अत्यंत निर्णायक ठरला. पीडितेच्या याच साक्षीच्या आधारे मे. न्यायालयाने आरोपीला दोषी धरले.
सुनावण्यात आलेली शिक्षा:
न्यायालयाने आरोपी जगदिश चव्हाण याला खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:
भारतीय दंड विधान (IPC) कलम ३५४: ४ वर्षे सक्तमजुरी.
पोक्सो (POCSO) कायदा कलम ८: ४ वर्षे सक्तमजुरी.
पोक्सो (POCSO) कायदा कलम १२: ३ वर्षे सक्तमजुरी.
दंड: सर्व कलमांखाली मिळून एकूण ₹५०,०००/- दंडाचा आदेश.
सरकारी पक्ष व पोलिसांची कामगिरी
सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता व्ही. के. मुरचिटे, ए. एम. साटविलकर आणि एस. आर. हिंगमिरे यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद आणि मांडलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस ही कडक शिक्षा सुनावली.
या खटल्याच्या कामकाजात पैरवी कक्ष अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक मुद्दस्सर शेख, जत पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम बंडगर (ब.नं. ६२१) आणि पैरवी कक्षातील महिला कॉन्स्टेबल रेखा (ब.नं. २५४७) यांनी मोलाची मदत केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.