🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'रस्ता नाही तर मतदान नाही!'; ज्योतिरादित्य शिंदे तरुणांवर भडकले: 'माझ्यासमोर...'

'रस्ता नाही तर मतदान नाही!'; ज्योतिरादित्य शिंदे तरुणांवर भडकले: 'माझ्यासमोर...'


केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना गुना मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना नाराजीला तोंड द्यावं लागलं. बरखेडा गिर्दमध्ये आयोजित मुख्यमंत्र्यांच्या जनविश्वास शिबिरात भाग घेतला, जिथे त्यांनी 'नमो ड्रोन दीदी किरण'च्या मदतीने ड्रोन उडवले.

या कार्यक्रमादरम्यानचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. जो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. कार्यक्रमानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. दरम्यान, ते आपल्या गाडीत बसून लोकांच्या तक्रारी ऐकत होते. काही तरुणांनी त्यांचा ताफा थांबवून रस्त्याच्या समस्येबद्दल तक्रार केली. एका तरुणाने रस्ता वेळेवर पूर्ण न झाल्यास मतदान न करण्याची धमकी दिली. शिंदे संतापले आणि म्हणाले, "माझ्याशी अशा भाषेत बोलू नका."
नेमकं काय प्रकरण आहे?

मतदारसंघातील काही लोक आपली तक्रार घेऊन त्यांच्याकडे आले होते. ते ज्योतिरादित्य शिंदे यांना म्हणाले की, "माझी विनंती आहे की, यावेळी हा रस्ता वेळेपूर्वीच तयार करावा. जर रस्ता केला नाही, तर आमच्यापैकी कोणीही मतदान करणार नाही." यावर शिंदे संतापल्याचे दिसून आले. "माझ्याशी कधीही अशी भाषा वापरू नका. मी सर्वांबद्दल बोलत आहे." ते पुढे म्हणाले, "तुम्ही येऊन विनंती करता, तर काम करणे ही माझी जबाबदारी आहे." मंत्र्यांचा संतप्त सूर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे शिंदे यांना सोशल मीडियात टीकेला सामोरे जावे लागत आहे.

नमो दीदी किरण ड्रोन उडवला
मध्य प्रदेशात मुख्यमंत्र्यांचे जनविश्वास शिबिर आयोजित केले जाते. या शिबिरांदरम्यान लोकप्रतिनिधी आणि अधिकारी गावोगावी पोहोचतात. शिंदे यांनी बरखेडा गिर्द गावाला भेट दिली. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आणि महिलांना आत्मनिर्भर बनवून सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. 'नमो ड्रोन दीदी' योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिला कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून नवीन शक्यता निर्माण करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.