सांगली : आपत्कालीन मदतीसाठी असलेल्या 'डायल १९२' या हेल्पलाइन क्रमांकावर बनावट आणि खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिवाजी रामचंद्र खंडागळे (वय २९, रा. त्रिमुर्ती कॉलनी, पोल मला, सांगली) असे या कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अक्षयकुमार माने यांनी फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम २१० अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १९:०६ वाजता आरोपी शिवाजी खंडागळे याने 'डायल ११२' वर कॉल करून आपल्या सासऱ्याने अंगावर पेट्रोल ओतले असून तात्काळ मदतीची गरज असल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेथे पोहोचल्यावर आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याच्या सासऱ्याने व त्यांच्या दोन मित्रांनी त्याला मारहाण करून अंगावर पेट्रोल ओतले आणि डोळ्यात चटणी टाकली.
मात्र, पोलिसांनी जेव्हा घटनास्थळावरील साक्षीदार आणि आरोपीच्या सासऱ्याऱ्यांकडे चौकशी केली, तेव्हा खरा प्रकार समोर आला. आरोपीचे सासरे त्याला त्याच्या पत्नी व मुलीला भेटू देत नव्हते. याच रागाच्या भरात आरोपीने पोलिसांना खोटी माहिती देऊन 'डायल ११२' चा गैरवापर केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या सांगण्यानुसार ही कारवाई करण्यात आली . या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार गोविंद कदम करत आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या काळात 'डायल ११२' या आपत्कालीन सेवेचा जबाबदारीने वापर करावा आणि पोलिसांना कोणतीही खोटी माहिती देऊ नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडून देण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.