🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण; टिळक रोडवर नेमकं काय घडलं?

डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण; टिळक रोडवर नेमकं काय घडलं?


पुणे : गणेशोत्सवात डीजे आणि उच्च डेसिबलच्या ध्वनीप्रदूषणाला विरोध करणारे विद्यानंद बापट यांना पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत असताना ही घटना घडल्याची माहिती आहे.

यावेळी गणेश मंडळाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीच्या घटनेनंतर गणेशोत्सवातील डीजेच्या वापराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या घटनेच्या वेळी नेमकी परिस्थिती काय होती, तसेच प्रकरणात पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

महापालिका बैठकीतील वादानंतर चर्चेत
२०२६ च्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी पुणे महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत बापट यांनी डीजे आणि उच्च डेसिबलच्या लाऊडस्पीकरवर पूर्ण बंदी घालण्याची मागणी केली होती. या मागणीवरून गणेश मंडळांच्या काही कार्यकर्त्यांसोबत त्यांचा जोरदार वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना बैठकीतून बाहेर काढले होते. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर बापट चर्चेच्या केंद्रस्थानी आले.
ध्वनीप्रदूषणाला विरोध, पारंपरिक वाद्यांना समर्थन

बापट यांची भूमिका सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अवाजवी ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात आहे. राज्यघटनेने दिलेले धर्मस्वातंत्र्य हे भीषण ध्वनीप्रदूषण करण्यासाठी किंवा रस्ते अडवण्यासाठी परवानगी देत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. पारंपरिक वाद्यांच्या वापराला आपला विरोध नसून अवाजवी गोंगाटाला विरोध असल्याचे ते सांगतात.

कोण आहेत विद्यानंद बापट?
विद्यानंद बापट हे पुण्यातील नारायण पेठेतील रहिवासी असून त्यांचे वय सुमारे ३७ वर्षे आहे. ते मुळचे रत्नागिरीचे असून गेल्या सुमारे आठ वर्षांपासून पुण्यात राहत आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. ते बीपीओ क्षेत्रात कार्यरत असून बहुतांश काम घरून करतात.

पूर्वी सामान्य नागरिक म्हणून फारसे परिचित नसलेले बापट पुण्यातील काही पुरोगामी संघटनांच्या उपक्रमांमध्ये सहभागी असल्याचे सांगितले जाते. एका वृत्तानुसार, त्यांचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीशीही संबंध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

त्यांच्या डीजेविरोधी भूमिकेला काही नागरिकांनी समर्थन दिले आहे. तर काहींनी त्यांच्यावर टीका करत "नक्षली मानसिकता" असल्याचे आरोप केले असून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सध्या बापट या विषयावर माध्यमांमधून आपली भूमिका मांडत आहेत. दरम्यान, कशाळे चौकातील मारहाणीच्या घटनेप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईकडे लक्ष लागले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.