🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

६५ हजार रिक्त पदे भरली जाणार; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना तत्काळ मागणीपत्र सादर करण्याचे निर्देश

६५ हजार रिक्त पदे भरली जाणार; मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना तत्काळ मागणीपत्र सादर करण्याचे निर्देश


मुंबई: राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणाऱ्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेतील पेपरफुटी प्रकरणामुळे उमेदवारांमध्ये निर्माण झालेला असंतोष दूर करण्यासाठी विविध विभागातील सुमारे ६५ हजार ८६६ रिक्त पदे भरण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरु झाल्या आहेत. यातील सुमारे ४६ हजार हजार पदे लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. त्यासाठी सबंधित विभागांनी पदभरतीचे मागणीपत्र लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य लोकसवा आयोगाकडून गेल्या दोन वर्षात घेण्यात आलेल्या विविध पदभरतीच्या परिक्षांचे पेपर फुटल्यावरुन राज्यभरातील उमेदवारांनी गेल्या काही दिवासांपासून विविध ठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात या आंदोलनाची दखल घेत एमपीएससीच्या राज्यभरातून आलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांवर चर्चा केली. राज्यात घडलेल्या पेपरफुटीच्या घटना आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या भावनांचा झालेला उद्रेक याच्याशी सहमती दर्शवित फडणवीस यांनी पेपरफुटीची विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा करीत उमेदवारांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला होता. विविध कारणांनी रखडलेल्या नोकरभरतीमुळे परिक्षार्थी- उमेदवारांमध्ये निर्माण झालेला असंतोष दूर करण्यासाठी भरतीप्रक्रियेला गती देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी विविध विभागांना दिले आहेत. 

गेल्याच आठवड्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पदभरती आणि रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाने रिक्त पदांबाबचे सादरीकरण करताना आजमितीस ६५ हजार ८६६ रिक्त पदे असून त्यापैकी ४६ हजार ४६४ पदे लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरावी लागणार आहेत. तर पोलिस बोर्डाकडून पोलिस शिपायांची १६ हजार ८९६ आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची २ हजार ५०६ रिक्त पदे भरणे अपेक्षित आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ४६ हजार ४६४रिक्त पदे भरणे अपेक्षित असतानाही विविध विभागांनी आयोगाकडे जेमतेम ६-७ हजार पदभरतीची मागणी नोंदविल्याची माहिती यावेळी मंत्रिमंडळास देण्यात आली. सर्वाधिक रिक्त जागा असलेल्या विभागांमध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठा, वैद्यकीय शिक्षण, कृषी, महसूल, वित्त, विधी व न्याय, गृह, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण तसेच सहकार या विभागांचा समावेश असून गृह विभागाने रिक्त जागांपैकी ६५ टक्के जागा भरण्यासाठी लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र सादर केले आहे.


सर्वाधिक रिक्त जागा
पाणीपुरवठा विभागाकडे सर्वाधिक ८ हजार ६५२ रिक्त जागा असून त्यापैकी ६७ जागा भरण्यासाठी एमपीएससीला मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने ७ हजार ८६८ रिक्त पदांपैकी १० टक्के म्हणजेच ८२२ पदे भरण्यासाठी आयोगाकडे मागणीपत्र सादर केले आहे. कृषी विभागातही सुमारे ६ हजार पदे रिक्त असून या विभागाचा अजून आकृतिबंधत मंजूर झालेला नाही. त्यामुळे विभागाकडून एकाही पदभरतीचा मागणी प्रस्ताव सामान्य प्रशासन किंवा आयोगाकडे दाखल झालेला नाही. महसूल विभागाने ४ हजार ७७० रिक्त पदांपैकी १७ टक्के म्हणजेच ८५२पदे भरण्याचे मागणीपत्र सादर केले आहे. अशाचप्रकारे वित्त विभागाने ३ हजार १८४ रिक्त पदांपैकी २५ टक्के-८०० पदे भरण्यासाठी मागणीपत्र दिले आहे. गृह विभागाने २ हजार रिक्त पदांपैकी १४०० (६५ टक्के) पदभरतीसाठी प्रस्ताव सादर केला आहे. 

तर सहकार विभागाने १२४७ पैकी ५८६ पदे भरण्यासाठी (४७टक्के) मागणी प्रस्ताव दिला आहे. विधि व न्याय विभागात दोन हजार, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागात दीड हजार, सार्वजनिक बांधकाम विभागात सुमारे दीड हजार पदे रिक्त असतानाही या विभागांनी भरतीसाठी मागणीप्रस्ताव सादर केले नसल्याचे मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणण्यात आल्याचे समजते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करीत सबंधित विभागांनी रिक्त जागा आणि भरावयाच्या जागांचे मागणीपत्र तातडीने द्यावे अशा सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. विविध विभागाकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागानी आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहितीचे एकत्रिकरण झाल्यावर विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत याचा तपशील स्पष्ट होईल. – व्ही. राधा, अतिरिक्त मुख्य सचिव (सेवा)



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.