🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत खळबळ! पतीचा घरीच अन् पत्नीचा रूग्णालयात दुर्दैवी अंत; पांढरा द्रव अन् उग्र वास, विषबाधा की आणखी काही?

सांगलीत खळबळ! पतीचा घरीच अन् पत्नीचा रूग्णालयात दुर्दैवी अंत; पांढरा द्रव अन् उग्र वास, विषबाधा की आणखी काही?


सांगली : पलूस शहरातील गंजीखाना परिसरात पती-पत्नीने घरगुती वादातून विषारी औषध प्राशन करून जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. बाळासाहेब मुरलीधर कदम (वय 58) यांचा सोमवार, दि. 31 ऑगस्ट रोजी राहत्या  घरी दुपारी 2.30 च्या सुमारास मृत्यू  झाला, तर त्यांच्या पत्नी उषा बाळासाहेब कदम (वय 46) यांचा उपचार सुरू असताना मंगळवारी, दि.1 सप्टेंबर रोजी सकाळी 6.45 च्या सुमारास सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत त्यांचा मुलगा अजय कदम (वय 28, व्यवसाय : एमआयडीसीतील खासगी नोकरी, सध्या रा. कागल, जि. कोल्हापूर) यांनी माहिती दिली.
घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचा संशय असून, या दुहेरी मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या  केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. मुलगा अजय कदम हा आई-वडिलांपासून विभक्त होऊन कागल येथे राहतो. बाळासाहेब कदम व त्यांची पत्नी उषा हे दोघेच पलूस येथे राहत होते. 30 ऑगस्ट रोजी दोघांमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला असावा. यातूनच पत्नी उषा यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्यांना पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर बाळासाहेब कदम यांनी पत्नीची प्रकृती गंभीर बनत असल्याचे लक्षात येताच, 31 ऑगस्ट रोजी स्वतःही विषारी औषध प्राशन केले. ही बाब त्यांचा मुलगा अजय कदम याच्या निदर्शनास आली. 
बाळासाहेब हे बेशुद्ध अवस्थेत असून, त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे मुलगा अजय यांना दिसले. त्यांना तात्काळ नातेवाईकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, उषा कदम यांची प्रकृतीही गंभीर बनत चालली होती. हे डॉक्टरांच्या लक्षात आल्यानंतर सोमवारी, दि. 31 ऑगस्ट रोजी दुपारी 12.22 वाजता पुढील उपचारासाठी त्यांना सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी, दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 6.45 वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू; अनेक प्रश्न अनुत्तरित

पतीचा घरात मृत्यू आणि त्यानंतर पत्नीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या घटनेबाबत परिसरात चर्चेला उधाण आले आहे. दोघांनी एकाच काळात विषारी औषध प्राशन करण्यामागे कौटुंबिक, आर्थिक, वैयक्तिक अथवा अन्य कोणते कारण होते का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

विशेष म्हणजे, बाळासाहेब कदम यांच्या मृत्यूच्या ठिकाणी आढळलेला पांढऱ्या द्रवाचा अंश व उग्र वास, तसेच उषा कदम यांनी विषारी औषध घेतल्याची नोंद यामुळे दोन्ही मृत्यूंचा परस्पर संबंध आहे का, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे. शवविच्छेदन अहवाल तसेच आवश्यक वैद्यकीय व पोलिस तपासातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दोन्ही मृत्यूंची नोंद पलूस पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार रूपाली कुरणे या तपास करीत आहेत.

पती-पत्नीने विषप्राशन करून आत्महत्या केली का?
त्यांनी विषारी पदार्थ कोणत्या परिस्थितीत घेतला आणि त्यामागे नेमके कारण काय होते, या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे या घटनेकडे केवळ आत्महत्या म्हणून न पाहता सर्व शक्यता तपासणे आवश्यक ठरणार आहे. पोलिसांच्या तपासाकडे आता पलूस शहराचे लक्ष लागले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.