शेअर बाजारात कधी तेजी येईल, कधी मंदी आणि कधी बाजार एका मर्यादित पातळीतच राहील, हे अचूकपणे सांगणे कठीण असते. मात्र, एखाद्या शेअरमध्ये मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे, असा अंदाज असेल तर ऑप्शनच्या माध्यमातून त्यानुसार रणनीती आखता येते.
गेल्या भागात आपण शेअर बाजारात मंदीचे वातावरण असताना त्यातून नफा कसा मिळवता येऊ शकतो, हे पाहिले होते. मात्र, बाजारात नेहमीच घसरण होईल असे नाही. अनेकदा एखाद्या शेअरमध्ये किंवा निर्देशांकात मोठी हालचाल होण्याची शक्यता असते; मात्र ती हालचाल नेमकी कोणत्या दिशेने होईल, याबाबत निश्चितता नसते.अशा वेळी वापरता येणाऱ्या पर्यायांपैकी एक महत्त्वाची रणनीती म्हणजे 'स्ट्रॅप स्ट्रॅटेजी'. या रणनीतीचे वैशिष्ट्य म्हणजे शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली तर दोन कॉल ऑप्शनमुळे नफ्याची क्षमता मोठी असते. त्याचवेळी शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाली तरी पुट ऑप्शनमधून नफा मिळवता येतो.
मात्र, शेअरची किंमत फारशी हलली नाही तर भरलेले प्रीमियम नुकसान होऊ शकते. स्ट्रॅप स्ट्रॅटेजी नेमकी कशी करायची, त्यासाठी किती प्रीमियम द्यावे लागते आणि शेअरची किंमत वेगवेगळ्या पातळ्यांवर गेल्यास किती नफा किंवा नुकसान होऊ शकते, हे आपण काल्पनिक उदाहरणातून समजून घेऊया.
स्ट्रॅप स्ट्रॅटेजी कशी करावी?
शेअर बाजारात एखाद्या निर्देशांकात किंवा शेअरच्या किमतीत मोठी वाढ होणार असेल, अशा वेळी स्ट्रॅप स्ट्रॅटेजी करता येते. या स्ट्रॅटेजीचे वैशिष्ट्य म्हणजे, शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाली तर अमर्यादित नफा मिळू शकतो. तसेच, शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाली तरी नफा मिळतो. मात्र, शेअरच्या किमतीत मोठी वाढ झाल्यानंतर मिळणाऱ्या नफ्याच्या तुलनेत घसरण झाल्यानंतर मिळणारा नफा कमी असतो. दुसरीकडे, शेअरच्या किमतीत फारशी वाढ किंवा घसरण झाली नाही, म्हणजेच शेअरची किंमत जवळपास स्थिर राहिली, तर मात्र नुकसान होऊ शकते. स्ट्रॅप स्ट्रॅटेजीसाठी तीन व्यवहार करावे लागतात. या स्ट्रॅटेजीमध्ये सध्याच्या बाजारभावाच्या म्हणजेच एटीएम (ATM - At The Money) किमतीवर दोन कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शन खरेदी करायचा असतो. सारख्याच किमतीचा (एटीएम) म्हणजे सध्या बाजारात शेअरची जी किंमत चालू असेल त्याच किमतीला खरेदी करायाचे आहे. हे तिन्ही ऑप्शन म्हणजे दोन कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शन हे एकाच महिन्याच्या एक्स्पायरीचे आणि एकाच कंपनीचे असणे आवश्यक आहे.समजा, विप्रो कंपनीच्या शेअरमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे, असे वाटल्यास त्यात स्ट्रॅप स्ट्रॅटेजी करायची आहे. विप्रोच्या शेअरची सध्याची बाजारातील किंमत ५५० रुपये आहे. विप्रोच्या एका ऑप्शन लॉटमध्ये १०० शेअर आहेत, असे गृहीत धरू. स्ट्रॅप स्ट्रॅटेजीनुसार सध्याच्या बाजारभावाच्या म्हणजेच ५५० रुपयांच्या स्ट्राइक प्राइसवर एक पुट ऑप्शन आणि दोन कॉल ऑप्शन खरेदी करायचे आहेत. समजा, ५५० रुपयांच्या स्ट्राइक प्राइसच्या पुट ऑप्शनचे प्रीमियम १२ रुपये प्रति शेअर आहे, तर दोन कॉल ऑप्शनचे प्रीमियम १२.५० रुपये प्रति शेअर आहे.
१) एक पुट ऑप्शन खरेदी
विप्रोचा ५५० रुपयांच्या स्ट्राइक प्राइसचा एक पुट ऑप्शन १२ रुपये प्रति शेअर प्रीमियम देऊन खरेदी करायचा आहे.
प्रीमियम × शेअरची संख्या = एकूण प्रीमियम
१२ × १०० = १,२०० रुपये
म्हणजेच, एक पुट ऑप्शन खरेदी करण्यासाठी १,२०० रुपये प्रीमियम द्यावे लागतील.
२) दोन कॉल ऑप्शन खरेदी
विप्रोचे दोन कॉल ऑप्शन ५५० रुपयांच्या स्ट्राइक प्राइसवर १२.५० रुपये प्रति शेअर प्रीमियम देऊन खरेदी करायचे आहेत.
दोन लॉट म्हणजेच एकूण २०० शेअर.
१२.५० × २०० = २,५०० रुपये
म्हणजेच, दोन कॉल ऑप्शन खरेदी करण्यासाठी २,५०० रुपये प्रीमियम द्यावे लागतील.
म्हणजेच, तीनही ऑप्शन, दोन कॉल ऑप्शन आणि एक पुट ऑप्शन खरेदी करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील, ते पाहूया.
विप्रोचे दोन कॉल ऑप्शन खरेदी करण्यासाठी २,५०० रुपये प्रीमियम, तर एक पुट ऑप्शन खरेदी करण्यासाठी १,२०० रुपये प्रीमियम द्यावा लागेल.
त्यामुळे तीनही ऑप्शन खरेदी करण्यासाठी एकूण प्रीमियम खर्च २,५०० १,२०० = ३,७०० रुपये येईल. म्हणजेच, स्ट्रॅप स्ट्रॅटेजी करण्यासाठी एकूण ३,७०० रुपये प्रीमियम द्यावे लागतील. (येथे उदाहरणादाखल आकडेवारी घेतली आहे, यात ब्रोकरेज गृहीत धरण्यात आलेला नाही. शिवाय लॉट साईज देखील अधिक आहे मात्र उदाहरण समजण्यास सोपे व्हावे यासाठी लहान आकडेवारी घेतली आहे.) आता तिन्ही ऑप्शन्स म्हणजे एक दोन कॉल ऑप्शन्स आणि एक पुट ऑप्शन्समध्ये शेअरच्या किमती कमी-जास्त होतात, त्यानुसार किती नफा-नुकसान होते ते बघूया.
एक्स्पायरीच्या वेळी शेअरची किंमत (₹) दोन कॉल ऑप्शनमधील नफा/तोटा (₹) एक पुट ऑप्शनमधील नफा/तोटा (₹) एकूण नफा/तोटा (₹)
४९० -२,५०० ४,८०० २,३००
५०० -२,५०० ३,८०० १,३००
५१० -२,५०० २,८०० ३००
५२० -२,५०० १,८०० -७००
५३० -२,५०० ८०० -१,७००
५४० -२,५०० -२०० -२,७००
५५० -२,५०० -१,२०० -३,७००
५६० -५०० -१,२०० -१,७००
५७० १,५०० -१,२०० ३००
५८० ३,५०० -१,२०० २,३००
५९० ५,५०० -१,२०० ४,३००
६०० ७,५०० -१,२०० ६,३००
दर वाढल्यावर विप्रोच्या शेअरच्या किमतीत जशी वाढ/घट होते. त्यानुसार नफा/नुकसान होण्याच्या किती शक्यता आहेत ते बघू या.
शक्यता – १
समजा आपण विप्रोच्या शेअरमध्ये स्ट्रॅप स्ट्रॅटेजी केल्यानंतर विप्रोच्या शेअरची किंमत ५९० झाली तर आपल्याला फायदा होईल. कारण आपण दोन कॉल ऑप्शन ५५० रुपयांना खरेदी केले होते. त्यात (५९०-५५० = ४० रु.) ४० रुपये प्रतिसमभाग फायदा होईल म्हणजे [४० रु. × २०० शेअर (दोन कॉल ऑप्शन)] = ८,००० रुपये नफा होईल. परंतु आपण दोन कॉल ऑप्शन विकत घेण्यासाठी २५०० रुपयांचे प्रीमियम दिले होता. त्यामुळे ८००० रुपयांच्या नफ्यातून २५०० रुपये प्रीमियम वजा केल्यास ५५०० रुपये एकूण नफा शिल्लक राहील. शिवाय एक पुट ऑप्शन आपण ५५० रुपयांना खरेदी केला होता. तो वर्थलेस एक्सपायर झाल्याने आपण पुट ऑप्शन खरेदी करण्यासाठी जेवढे प्रीमियम अदा केले होते तेवढेच नुकसान होईल. येथे पुट ऑप्शन खरेदी करण्यासाठी १२०० रुपये प्रीमियम दिले होते.
वर बघितल्याप्रमाणे विप्रोच्या शेअरची किंमत ५९० रुपये झाली तर जे दोन कॉल ऑप्शन खरेदी केले होते त्यात ५५०० रुपये नफा होईल म्हणजेच (५५०० नफा – १२०० नुकसान = ४३०० नफा) ४३०० रुपये नफा होईल. विप्रोच्या शेअरची किंमत ५९० पेक्षा आणखी वाढल्यास नफ्यात वाढ होत जाईल.
शक्यता २
समजा विप्रोच्या शेअरची किंमत ५०० रुपये झाली तर आपल्याला फायदा होईल का?
विप्रोचा एक पुट ऑप्शन आपण ५५० रुपयांना विकला होता. यात (५५०-५०० = ५० रु.) ५० रुपये प्रतिशेअर फायदा होईल म्हणजेच ५० रुपये × १०० = ५००० रुपये नफा होईल. पण हा पुट ऑप्शन खरेदी करण्यासाठी आपण १२०० रुपये प्रीमियम अदा केले होते. ते यातून वजा केल्यास (५००० – १२०० = ३८००) ३८०० नफा शिल्लक राहील. त्याचवेळी शिवाय दोन कॉल ऑप्शन ५५० रुपयांना खरेदी केले होते. ते वर्थलेस एक्सपायर झाल्याने आपण दोन कॉल ऑप्शन खरेदी करण्यासाठी जेवढे प्रीमियम अदा केले होते तेवढेच नुकसान होईल. येथे दोन कॉल ऑप्शन खरेदी करण्यासाठी २५०० रुपये प्रीमियम दिले होते.
त्यामुळे विप्रोच्या शेअरची किंमत ५०० रुपये झाली तर पुट ऑप्शन खरेदी केला होता त्यात ३८०० रुपये नफा होईल, पण दोन कॉल ऑप्शन खरेदी केले होते त्यात २५०० रुपये नुकसान होईल. म्हणजेच (३८०० नफा – २५०० नुकसान = १३०० नफा) १३०० रुपये एकूण नफा शिल्लक राहील. विप्रोचा शेअरची किंमत आणखी कमी झाल्यास नफा वाढत जाईल.
शक्यता ३ :
स्ट्रॅप स्ट्रॅटेजी केल्यानंतर जर विप्रोच्या शेअरच्या किमतीत बदल झाला नाही म्हणजेच विप्रोची किंमत ५५० रुपये राहिल्यास सर्व ऑप्शन वर्थलेस एक्सपायर होतील. त्यामुळे ऑप्शन खरेदीसाठी जेवढे प्रीमियम दिले होते तेवढेच आपले नुकसान होईल. या परिस्थितीत आपल्याला ३७०० इतके नुकसान होईल.
स्ट्रॅप स्ट्रॅटेजीचे गणित पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते-या रणनीतीमध्ये शेअरच्या किमतीत मोठी हालचाल होणे महत्त्वाचे आहे. तेजी आली तर दोन कॉल ऑप्शनमुळे नफ्याची क्षमता अधिक असते, तर मोठी घसरण झाली तरी पुट ऑप्शनमधून नफा मिळू शकतो. मात्र, शेअरची किंमत स्ट्राइक प्राइसच्या आसपासच राहिली तर भरलेले प्रीमियम नुकसान होऊ शकते.
म्हणूनच स्ट्रॅप स्ट्रॅटेजी ही केवळ 'शेअर वाढेल' या अंदाजावर आधारित नसून, शेअरमध्ये मोठी हालचाल होण्याची शक्यता लक्षात घेऊन आखली जाते. या रणनीतीचा वापर करण्यापूर्वी एकूण प्रीमियम खर्च, ब्रेक-इव्हन पातळी, संभाव्य नफा आणि कमाल नुकसान यांचे गणित समजून घेणे आवश्यक आहे.
ऑप्शन व्यवहारांमध्ये नफा मिळवण्याची संधी जितकी असते, तितकीच जोखीमही असते. त्यामुळे केवळ रणनीतीचे नाव किंवा नफ्याची शक्यता पाहून व्यवहार न करता, संपूर्ण गणित समजूनच निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.