वाळूचा टेम्पो अडविल्याने पोलिसाला नेले फरफटत, सातारा जिल्ह्यातील घटना
म्हसवड (जि. सातारा) : बेकायदा वाळू वाहतुकीची चौकशी करत असताना पोलिस कर्मचाऱ्याला टेम्पोसह सुमारे ४०० ते ५०० मीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजता म्हसवड शहराच्या हद्दीत घडली.
यात पोलिस कर्मचारी महावीर कोकरे हे जखमी झाले.
याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी दोघांना त्यांच्या घरातून पहाटे अटक केली. प्रीतम नवनाथ लोखंडे (रा. मल्हारनगर, म्हसवड), अवी अशोक तोरणे (रा. म्हसवड, ता. माण) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हवालदार महावीर कोकरे हे शासकीय दुचाकीवरून संशयित वाहनांची तपासणी करत होते. मेगासिटी ते बनगरवाडी-वीरकरवाडी मार्गावर त्यांना विनानंबरचा दुधी रंगाचा टेम्पो संशयास्पदरीत्या जाताना दिसला. वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये वाळू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
🫣 कोकरे यांनी चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला, मात्र त्याने परवाना नसल्याचे सांगितले. यावेळी अवी तोरणे याने प्रीतमला टेम्पो वेगाने चालवण्यास सांगितले. त्यानंतर त्याने टेम्पो वेगाने पुढे नेला. कोकरे यांनी चालकाच्या बाजूच्या दरवाजाला धरले असता त्यांना वाहनासोबत बरेच अंतर फरफटत नेले. काही अंतर पुढे गेल्यानंतर रस्त्यावर कोकरे यांचा हात सुटला. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. चालकाने टेम्पो पाठीमागे घेऊन त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोकरे बाजूला झाल्याने बचावले. यात त्यांच्या हाताला, पोटरीला, गुडघ्याला व घोट्याला दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.