गरोदरपणात मुख्य परीक्षा अन् २६ दिवसांच्या तान्ह्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत; ‘लढाऊ’ आई थेट झाली DSP!
माणसामध्ये जर जिद्द, मेहनत आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असेल,तर तो कोणतेही आव्हान पार करू शकतो. मध्य प्रदेशातील मैहरच्या वर्षा पटेल यांनी आपल्या प्रवासातून हीच गोष्ट सिद्ध करून दाखविली आहे. कडेवर 26 दिवसांची मुलगी घेत मुलाखत दिली आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची म्हणजेच MPPSC ची परीक्षा उत्तीर्ण करत थेट DSP म्हणजेच पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली. त्यामुळे वर्षा यांचा हा प्रवस एखाद्या चित्रपटासारखा वाटतो.
वडीलांचे निधन
वर्षा यांचं शालेय शिक्षण दमोह येथे झालं.बारावीमध्ये त्यांनी 75 टक्के गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी जीवशास्त्र विषयातून B.Sc. ची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. या तयारीदरम्यान इंदूरमध्ये त्यांनी केवळ सहा महिने कोचिंग घेतले आणि त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वयं अभ्यासावर भर दिला. पण 2015 मध्ये त्यांचे अचानक निधन झाले. त्या घटनेने संपूर्ण कुटुंबाला हादरवून सोडले, शिक्षण अर्धवट राहिले आणि कुटुंबाला दमोह सोडून मैहरमध्ये स्थायिक व्हावे लागले. मात्र कठीण परिस्थितीत असूनही वर्षाने हार मानली नाही तरअधिकारी होण्याचे स्वप्न तिने आणखी दृढ केले.
पतीने दिली साथ
वर्षा यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. 2017 मध्येते त्यांचं लग्न संजय पटेल यांच्याशी झाले. ते इंजिनिअर आहेत. मात्र वर्षा यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी त्यांनी नोकरी सोडून मैहरमध्ये व्यवसाय सुरू केला. त्यामुळे वर्षा यांना अभ्यास आणि कुटुंबाची जबाबदारी यांचा समतोल साधता आला.
26 दिवसांच्या मुलीला घेऊन मुलाखत
वर्षा यांनी अनेक वेळा परीक्षा दिली होती, पण त्यांना यश मिळाले नाही. तरीही त्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवला. या काळात त्या गर्भवती झाल्या, तरीही त्यांनी आपला अभ्यास आणि तयारी थांबवली नाही. 22 जुलै 2025 रोजी त्यांनी सिजेर शस्त्रक्रियेद्वारे मुलगी श्रीजाला जन्म दिला. 26 दिवसांनंतर त्यांची मुलाखत होती. त्यांच्या जखमा पूर्णपणे भरल्या नव्हत्या, तरीही त्या नवजात मुलीला घेऊन पतीसोबत मुलाखतीला पोहोचल्या.निकाल लागल्यावर वर्षा यांची DSP पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी महिला वर्गात पहिले स्थान पटकावले. कुटुंबाची आणि मुलाची जबाबदारी असल्यामुळे काहीही करू शकत नाही, असे मानणाऱ्या लोकांसाठी वर्षा यांची ही कहाणी प्रेरणादायी आहे. या प्रवासात त्यांच्या पतीने त्यांना पूर्ण साथ दिली. योग्य जीवनसाथीची साथ असते आणि मेहनत करण्याची जिद्द असते, तेव्हा काहीही अशक्य नसते, हेच वर्षा यांनी दाखवून दिले.
उप जिल्हाधिकारी पदाचे ध्येय
पाचव्या प्रयत्नात MPPSC परीक्षा उत्तीर्ण करून DSP बनल्यानंतरही वर्षा यांनी आपली तयारी थांबवलेली नाही. आता उप जिल्हाधिकारी होण्याचं त्यांचं पुढचं लक्ष्य आहे. त्यासाठी त्या MPPSCच्या पुढच्या प्रयत्नाची तयारी करत आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्षा यांचा संदेशही महत्त्वाचा आहे. तयारी अर्धवट सोडू नका, यशासाठी वेळ, संयम आणि सातत्याने मेहनत करणं आवश्यक आहे, असं त्या सांगतात. त्यामुळे वर्षा यांची ही कहाणी त्या सर्व जबाबदाऱ्यांच्या ओझ्यातही स्वतःची स्वप्ने पूर्ण करू इच्छिणाऱ्या प्रत्येक स्त्री-पुरुषासाठी प्रेरणादायी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.